"आमची महादेवी आम्हाला परत द्या", नांदणीतील हत्तीणीसाठी धनंजय पोवारनं शेअर केला व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 19:05 IST2025-07-30T19:04:57+5:302025-07-30T19:05:18+5:30

महादेवी हत्तीणीला पुन्हा नांदणीत आणण्याची मागणी सुरू झाली आहे.

Kolhapur Mahadevi Elephant Handed Over To Vantara Gujarat Dhananjay Powar Emotional Appeal To Bring Her Back | "आमची महादेवी आम्हाला परत द्या", नांदणीतील हत्तीणीसाठी धनंजय पोवारनं शेअर केला व्हिडीओ

"आमची महादेवी आम्हाला परत द्या", नांदणीतील हत्तीणीसाठी धनंजय पोवारनं शेअर केला व्हिडीओ

 Kolhapur Mahadevi Elephant: कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठामधील प्रसिद्ध महादेवी हत्तीण न्यायालयीन आदेशानुसार गुजरातमधील अंबानी यांच्या वनतारा (Vantara ) हत्ती केंद्रात रवाना करण्यात आली. महादेवीच्या निरोपावेळी गावात भावूक वातावरण आणि सर्वांच्याच डोळ्यांत अश्रू होते. मात्र, या निर्णयामुळे अवघ्या पंचक्रोशीतील गावकऱ्यांच्या मनात भावनिक असंतोष निर्माण झाला आहे. अनेकांनी न्यायालयाच्या निकालावर नाराजी व्यक्त करत सोशल मीडियावर हत्तीणीला पुन्हा नांदणीत आणण्याची मागणी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर 'बिग बॉस मराठी ५' फेम अभिनेता धनंजय पोवार याने इन्स्टाग्रामवर एक भावनिक व्हिडीओ शेअर करत आपली भूमिका मांडली. 

धनंजय पोवारने इन्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केलाय. ज्यात कॅप्शनमध्ये त्यानं लिहलं, "लोकांच्या भावना दुखावल्या आहेत त्याची थोडीशी जाणीव ठेवा आणि आमची महादेवी आम्हाला परत द्या". तर व्हिडीओमध्ये तो म्हणतो, "न्यायालयाच्या निकालानंतर आमच्या महादेवी हत्तीणीला वनविभागामध्ये नेल्यानंतर जो गदारोळ इथे सुरू आहे. त्यावर मला काही बोलायचं आहे की, आपण ज्या सरकारला निवडून दिलं आहे, ते सरकार, वनविभाग आणि त्या कुटुंबाला हे लक्षात यायला हवं की, जो विरोध केला जात आहे. तो आर्थिक गोष्टींसाठी नाही, हा भावनिक विषय आहे. लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. जिला आम्ही महादेवीचा दर्जा दिला, तिच्याकडे आम्ही आदराने, श्रद्धेने आणि अंंत:करणातून आलेल्या प्रेमाने पाहतो, तिला तुम्ही आता वनविभागात घेऊन गेला आहात".

पुढे बोलताना तो म्हणतो, "माणसांमध्ये वाढलेली आहे ती, माणसांच्या प्रेमाची भुकेली आहे. तिच्या छत्रछायेखाली तिच्या आशीर्वादाने, तिच्या आनंदात तिच्या दु:खात कितीतरी लोक लहानाचे मोठे झाले. गेली कित्येक वर्ष... आज सांगली, कोल्हापुर आणि कर्नाटका सीमा भागातील अनेक लोकांची तिच्याभोवती वर्दळ होती. हे फक्त आणि फक्त तिच्या प्रेमापोटी. लाखों लोकांचा जनसमुदाय तुमच्या समोर, तुमच्या विरोधात उभा राहिला. कारण म्हणजे प्रेम भावना आणि तिची असलेली काळजी. या लाखो लोकांचा विचार करा. त्यांच्या भावनेचा विचार करा. ती हत्तीण त्यांना परत द्या"

शेवटी तो म्हणाला, "खूप लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. मला हजारो लोकांनी मेसेज केले आहेत की, यावर काहीतरी पर्याय असायला हवा. यासाठी तुम्ही बोला. लोकांना बोलण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी मला अनेकांनी सांगितलं. पण मी लोकांना व्यक्त होण्यासाठी किंवा प्रवृत्त करण्यापेक्षा हे म्हणेन की, तुम्ही जिला घेऊन गेला आहात, त्याचं कारण काहीही असो. पण हजारो लोकांच्या भावनांचा विचार करून तुम्ही तिला परत द्या. मला एवढंच सांगायचं की त्या लाखो लोकांचा आशिर्वाद घ्या, त्यांना तळतळाट देण्यावर भाग पाडू नका", असं त्यानं म्हटलं. 


दरम्यान, चार वर्षाची असताना कर्नाटक येथून महादेवीला नांदणी येथे आणले होते. २०२० पासून न्यायालयीन लढाई सुरू होती. धार्मिक कार्यक्रमाबरोबरच नांदणी, जयसिंगपूर शहर परिसरात तिचा वावर होता. धार्मिक विधीसाठी हत्तीच्या वापराच्या हक्काचा संघर्ष असताना प्राण्यांच्या हक्कालाच प्राधान्य द्यावे लागेल असे निरीक्षक मुंबई उच्च न्यायालयाने नुकतेच नोंदवले होते. त्यानुसार हत्तीणीला दोन आठवड्यात पाठविण्याची परवानगी न्यायालयाने दिली होती. उच्च न्यायालयाच्या या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात मठ संस्थानने याचिका दाखल केली होती. न्यायालयाने मठाची याचिका फेटाळली आणि न्यायालयाने महादेवी हत्तिणीला वनतारा पशुसंग्रहालयाकडे सुपूर्द करण्याचे आदेश दिले.
 

Web Title: Kolhapur Mahadevi Elephant Handed Over To Vantara Gujarat Dhananjay Powar Emotional Appeal To Bring Her Back

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.