अर्चना पूरण सिंग यांना झालाय 'हा' दुर्मिळ आजार; लेकाने दिली मोठी माहिती, म्हणतो- "आईच्या हाताची..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 11:46 IST2026-01-10T11:43:54+5:302026-01-10T11:46:26+5:30
अर्चना पूरण सिंग यांना CRPS नावाचा दुर्मिळ आजार झाला आहे. या आजाराची माहिती त्यांच्या मुलाने दिली. जाणून घ्या काय म्हणाला?

अर्चना पूरण सिंग यांना झालाय 'हा' दुर्मिळ आजार; लेकाने दिली मोठी माहिती, म्हणतो- "आईच्या हाताची..."
'द कपिल शर्मा शो' (The Kapil Sharma Show) मधून प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्री अर्चना पूरण सिंग (Archana Puran Singh) सध्या एका कठीण प्रसंगातून जात आहेत. अर्चना यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून, त्यांना एका दुर्मिळ आजाराने ग्रासले आहे. ही माहिती देताना त्यांचा मुलगा आयुषमान सेठी सोशल मीडियावर भावूक झालेला पाहायला मिळाला.
नेमकं काय घडलं?
काही काळापूर्वी अर्चना पूरण सिंग यांच्या हाताच्या मनगटाला दुखापत झाली होती आणि हाड फ्रॅक्चर झाले होते. मात्र, केवळ फ्रॅक्चर होऊन हे प्रकरण थांबले नाही. शस्त्रक्रियेनंतर अर्चना यांना 'कॉम्प्लेक्स रिजनल पेन सिंड्रोम' (CRPS) नावाचा एक अतिशय दुर्मिळ आजार झाल्याचा खुलासा झाला आहे. या आजारामध्ये ज्या भागात दुखापत झाली आहे, तिथे तीव्र वेदना, सूज आणि नसांमध्ये प्रचंड जळजळ होते.
आयुषमानने आईचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये अर्चना यांच्या हाताला प्लास्टर दिसत आहे. आयुषमान म्हणाला, "आईच्या हाताची स्थिती आता पूर्वीसारखी राहणार नाही. डॉक्टरांनी सांगितले आहे की या आजारामुळे तिच्या हाताच्या हालचालींवर मर्यादा येऊ शकतात आणि तिला कायमस्वरूपी वेदना सहन कराव्या लागू शकतात. माझ्या आईने आयुष्यभर आम्हाला हसवले आहे, पण आज तिला अशा वेदनेत पाहणे माझ्यासाठी खूप कठीण आहे."
काय आहे CRPS आजार?
'कॉम्प्लेक्स रिजनल पेन सिंड्रोम' हा असा आजार आहे जो सहसा हात किंवा पायाला झालेल्या मोठ्या दुखापतीनंतर निर्माण होतो. ज्यामुळे वेदना सामान्य जखमेपेक्षा कितीतरी पटीने जास्त असतात. हा आजार बरा होण्यासाठी बराच काळ लागतो आणि काही वेळा याचे परिणाम कायमस्वरूपी राहतात.
अर्चना पूरण सिंग यांच्या या आजाराबद्दल कळताच त्यांचे चाहते आणि मनोरंजन विश्वातील कलाकारांनी अर्चना यांना काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. अनेक सेलिब्रिटींनी आयुषमानच्या पोस्टवर कमेंट्स करत अर्चना यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. नेहमी उत्साहात आणि हसतमुख राहणाऱ्या अर्चना या संकटावरही मात करून पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करतील, अशी आशा त्यांचे चाहते व्यक्त करत आहेत.