अक्षय कुमारच्या नाराजीवर अखेर कपिल शर्माचंच शिक्कामोर्तब, म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2022 16:52 IST2022-02-08T16:51:15+5:302022-02-08T16:52:18+5:30

एका प्रसंगामुळे अक्षय कुमार आणि कपिल शर्मा यांच्यात बिनसल्याची चर्चा समोर आली होती.

Kapil sharma react on akshay kumar upset of comedian joke says he is my brother we will shoot for bachchan pandey | अक्षय कुमारच्या नाराजीवर अखेर कपिल शर्माचंच शिक्कामोर्तब, म्हणाला...

अक्षय कुमारच्या नाराजीवर अखेर कपिल शर्माचंच शिक्कामोर्तब, म्हणाला...

'कॉमेडी किंग' कपिल शर्मा आणि बॉलीवूडचा 'खिलाडी' अक्षय कुमार यांची मैत्री तर जगजाहीर आहे. कपिल शर्माच्या शोमध्ये अक्षय दरवेळी हक्कानं येतो आणि दोघांमधील मैत्रीचं नातं किती घट्ट आहे हे देखील चाहत्यांना दिसून येत असतं. पण नुकतंच एका प्रसंगामुळे अक्षय कुमार आणि कपिल शर्मा यांच्यात बिनसल्याची चर्चा समोर आली होती. अक्षय कुमार कपिल शर्मा शोवर नाराज असल्यानं तो 'बच्चन पांडे' या त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी शोमध्ये येणार नसल्याचं वृत्त समोर आलं होतं. अखेर या संपूर्ण वादावर आता खुद्द कपिल शर्मा यानं ट्विट करत सारंकाही आलबेल असून सर्व गैरसमज दूर झाले आहेत, असं सांगून दोघांमध्ये खरंच बिनसलं होतं याला दुजोराच दिला आहे. 

"मित्रांनो, माध्यमांमध्ये माझ्या आणि अक्षय कुमारबाबत अनेक बातम्या येत होत्या. मी आताच अक्षय पाजी सोबत फोनवर संवाद साधला आणि सर्व गोष्टी आता मिटल्या आहेत. फक्त एका गैरसमजूतीमुळे ते घडलं होतं. लवकरच आम्ही 'बच्चन पांडे'च्या प्रमोशनचा एपिसोड शूट करणार आहोत. तो माझा मोठा भाऊ आहे आणि माझ्यामुळे ते कधीच त्रासले जाणार नाहीत", असं ट्विट कपिल शर्मा यानं केलं आहे. 

कपिलनं केलेलं ट्विट-

नेमकं काय घडलं होतं?
‘अतरंगी रे’ या सिनेमाच्या प्रमोशनसाठी अक्षय अलीकडे  ‘द कपिल शर्मा शो’मध्ये आला होता. यावेळी त्याने कपिलसोबत धम्माल मस्ती केली होती. मात्र या एपिसोडच्या शूटींगदरम्यान  कपिलनं पंतप्रधान मोदींच्या अक्षयनं घेतलेल्या मुलाखतीचा अप्रत्यक्ष उल्लेख करत, त्यावरून विनोद केला होता. अक्षयनं हा विनोद एपिसोडमधून गाळण्याची विनंती केली होती. कारण यात पंतप्रधान कार्यालयाचा उल्लेख केला होता. त्यावेळी चॅनलने त्याची ही विनंती मान्य केली होती. पण नंतर  याची क्लिप सोशल मीडियावर लीक झाली आणि बघता बघता व्हायरल आली. यामुळे अक्षय कुमार नाराज झाल्याची माहिती समोर आली होती. कपिलने आपल्या विश्वासाला तडा दिला, असं त्याचं मत झालं. याच नाराजीपोटी अक्षयनं  ‘द कपिल शर्मा शो’मध्ये येण्यास नकार दिल्याचं बोललं जात होतं. अक्षयचा ‘बच्चन पांडे’ हा सिनेमा येत्या १८ मार्चला चित्रपटगृहांत रिलीज होतोय.

 

Web Title: Kapil sharma react on akshay kumar upset of comedian joke says he is my brother we will shoot for bachchan pandey