सिनेमाच्या ऑडिशनचा फ्रॉड कॉल, जीव मुठीत घेऊन पळाली पण चकवा लागला अन् ३ तास...; जुईने सांगितली धक्कादायक घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 13:47 IST2025-11-21T13:47:28+5:302025-11-21T13:47:54+5:30
सिनेमाच्या ऑडिशनसाठी गेलेल्या जुईला धक्कादायक अनुभव आला होता. त्यानंतर ती जीव मुठीत घेऊन तिथून पळाली पण तिला रस्त्यात चकवा लागला. पण, स्वामींनी यातून मार्ग दाखवला आणि यातून ती सुखरुप बाहेर पडली.

सिनेमाच्या ऑडिशनचा फ्रॉड कॉल, जीव मुठीत घेऊन पळाली पण चकवा लागला अन् ३ तास...; जुईने सांगितली धक्कादायक घटना
जुई गडकरी हा मराठी टेलिव्हिजनचा लाडका आणि लोकप्रिय चेहरा आहे. 'पुढचं पाऊल' मालिकेतून घराघरात पोहोचलेली जुई सध्या 'ठरलं तर मग' या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. जुईने नुकतंच तिच्यासोबत घडलेली एक धक्कादायक घटना सांगितली आहे. सिनेमाच्या ऑडिशनसाठी गेलेल्या जुईला धक्कादायक अनुभव आला होता. त्यानंतर ती जीव मुठीत घेऊन तिथून पळाली पण तिला रस्त्यात चकवा लागला. पण, स्वामींनी यातून मार्ग दाखवला आणि यातून ती सुखरुप बाहेर पडली.
जुईने 'सकाळ' या वृत्तपत्रात हा अनुभव कथन केला आहे. जुई म्हणते, "माझी एक मालिका नुकतीच संपली होती आणि नवीन चित्रपटाच्या ऑडिशनसाठी मला फोन आला होता. वेळ दुपारी साडे बाराची होती आणि ठिकाण आरे वसाहतीतील रॉयल पाल्म्स हॉटेल. मी तयार होऊन ठरलेल्या वेळेआधी १० मिनिटं अगोदर त्या हॉटेलच्या बिल्डिंगखाली पोहोचले. त्या संपूर्ण भागात कोणीच नव्हतं. एक वेगळीच शांतता तिथे होती. आजूबाजूला मोठ्या इमारती होत्या पण एकही माणूस तिथे नव्हता. पार्किंगमध्ये मी गाडी पार्क केली. थोडा टचअप केला. मी गाडीतून खाली उतरत होते तितक्यात गाडीच्या खिडकीजवळ एक उंच आणि डेंजर दिसणारा वॉचमन आला. त्याने ज्याप्रकारे मला बघितलं त्यामुले मला भीतीच वाटली. त्याने मला विचारलं "कुठे जायचंय?".
"मी त्याला पत्ता दाखवला आणि त्याने मला त्या बिल्डिंगपर्यंत सोडलं. ती एक कमर्शियल बिल्डिंग होती. मला पाचव्या मजल्यावर जायचं होतं. लिफ्ट आल्यावर त्यातून काही माणसं बाहेर पडली. ते मला अशाप्रकारे बघत होते जसं काय जंगलात मी एकटीच आलीये. मी पाचव्या मजल्यावर गेले. तिथे एक मोठा कॉरिडोर होता ज्यात ३०-४० खोल्या होत्या. पण सगळी दारं बंद होती. तिथे एक मुलगा दिसला. त्याला मी कशीबशी हाक मारली आणि पत्ता विचारला. त्याने मला रस्ता सांगितला. मी गेले पण तिथे एकही माणूस दिसत नव्हता. तिथे एका कॉर्पोरेट कंपनीचं ऑफिस होतं. मी त्यांना विचारलं की मला ऑडिशनसाठी बोलवलंय. त्या बाईने मला कॉन्फरन्समध्ये बसायला सांगितलं. त्यांनी मला पाणी आणून दिलं. पण त्या पाण्यात काही असेल या शंकेने मी ते प्यायले नाही", असं ती म्हणाली.
पुढे जुईने सांगितलं, "नंतर १० मिनिटांनी ६०-६५ वयाचे सरदारजी तिथे आले. ते त्यांचं ऑफिस होतं. त्यांनी मला विचारलं की या माणसाचा फोन आला होता का? मी हो सांगितल्यावर ते म्हणाले की तो फ्रॉड आहे. तू चांगल्या घरातली दिसतेस. इथे थांबू नकोस. लगेच निघून जा. त्यानंतर मी लगेच तिथून निघाले. धापा टाकत पार्किंगला पोहोचले. गाडी काढली पण कोणत्या दिशेला जातेय ते माझं मलाच कळत नव्हतं. तिथे एक नकारात्मक ऊर्जा होती. मी अर्धा तास त्याच रस्त्यावर फिरत होते. हायवेला जाण्याचा मार्ग सापडत नव्हता. मी फिरून फिरून सतत एका भल्या मोठ्या बंद पडलेल्या हॉटेलसमोर येत होते. मोबाईलला रेंज नाही, रस्त्यावर कोणी नाही. तेवढ्यात मला एक सायकलवरुन माणूस येताना दिसला. त्यांना विचारलं हायवेला जायचंय. ते म्हणाले, "मॅडम हा काय हायवे, समोर तर आहे". मी अचानक एका वाईट स्वप्नातून बाहेर येतेय असं मला वाटलं. समोर हायवे होता आणि रस्त्याच्या बाजूला बोर्ड होता 'स्वामी समर्थ मंदिराकडे'. तीन तास मी त्या विचित्र संकटात अडकले होते. परत एकदा स्वामींनी दाखवून दिलं. भिऊ नकोस मी तुझ्या पाठिशी आहे".