'पूर्णा आजी'च्या भूमिकेत रोहिणी हट्टंगडी; जुई गडकरी भावुक, म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2025 16:18 IST2025-10-19T15:06:23+5:302025-10-19T16:18:33+5:30
'ठरलं तर मग' मालिकेत 'पूर्णा आजी'ची भूमिका अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी साकारणार आहेत. रोहिणी हट्टंगडी यांची मालिकेत एन्ट्री झाल्यावर जुई गडकरी भावुक झाल्याचं पाहायला मिळालं.

'पूर्णा आजी'च्या भूमिकेत रोहिणी हट्टंगडी; जुई गडकरी भावुक, म्हणाली...
स्टार प्रवाह वाहिनीवरील सर्वाधिक लोकप्रिय मालिकांपैकी एक असलेल्या 'ठरलं तर मग' मध्ये एक महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. मालिकेतील अनेक पात्रे प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिली आहेत, त्यापैकी एक महत्त्वाचे पात्र म्हणजे 'पूर्णा आजी'. काही दिवसांपुर्वी ही भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने मालिका विश्वात आणि चाहत्यांमध्ये शोककळा पसरली होती. ज्योती चांदेकर यांच्या निधनानंतर 'ठरलं तर मग' मालिकेत 'पूर्णा आजी'ची भूमिका कोण साकारणार, याबद्दल सोशल मीडियावर मोठी उत्सुकता आणि चर्चा रंगली होती. आता मालिकेच्या निर्मात्यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला असून एका अत्यंत प्रतिभावान आणि अनुभवी अभिनेत्रीची निवड केली आहे. ज्येष्ठ आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी या 'पूर्णा आजी' यांची भूमिका साकारणार आहेत. रोहिणी हट्टंगडी यांची मालिकेत एन्ट्री झाल्यावर जुई गडकरी भावुक झाल्याचं पाहायला मिळालं.
जुई गडकरीनं इनस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केलाय. ज्यात ती म्हणते, "फायनली! सुभेदारांच्या घरात पुन्हा एकदा पूर्णा आजीचं आगमन झालेलं आहे. तुम्हा सगळ्यांनाच माहितीये… आमची आधीची पूर्णा आजी दुर्दैवाने आम्हाला सर्वांना सोडून गेली. पण, आता रोहिणी ताई सेटवर आलेल्या आहेत. आता इथून पुढे मालिकेत काय घडणार, मालिकेची कथा कोणत्या वळणावर जाणार हे पाहण्यासाठी आम्ही सुद्धा तेवढेच उत्सुक आहोत. कारण, ज्योती ताई अचानक आम्हाला सोडून गेल्या…त्यांच्या निधनानंतर बऱ्याच गोष्टी बदलल्या. आता पूर्णा आजीबरोबर सीन्स करायला आम्ही पुन्हा एकदा तयार आहोत".
पुढे ती म्हणाली, "आज जेव्हा रोहिणी ताई सेटवर आल्या तेव्हा एक गोष्टी खूप जाणवली… मी ज्योती ताईशी खूप कनेक्ट होते… सतत तिच्याजवळ असायचे. आज रोहिणी ताईंना पाहिल्यावर त्यांना पुढे जाऊन पटकन मिठी मारावी असं मला वाटलं होतं. कारण, त्या पूर्णा आजीच्या लूकमध्ये आमच्यासमोर आल्या होत्या. पण, मी पुढे गेले नाही… काहीच बोलले नाही. कारण, तो क्षण माझ्यासाठी खूपच भावनिक होता. मला ज्योती ताईंची अचानक खूप आठवण आली… तिला मी कायम मिस करत राहीन. त्यानंतर काही वेळाने मी रोहिणी ताईंना भेटायला गेले. आता त्यांच्या एन्ट्रीनंतर मालिकेचं कथानक कसं पुढे जाणार हे जाणून घेण्यासाठी मी सुद्धा तेवढीच उत्सुक आहे. बऱ्याच दिवसांपासून तुम्हाला सर्वांनाही मालिकेत पूर्णा आजीला पाहायचं होतं. तर, ती यानिमित्ताने पूर्ण झाली असेल. हे विशेष भाग प्रेक्षकांना २३ ते २५ ऑक्टोबरदरम्यान पाहता येणार आहेत. त्यामुळे बघत राहा ठरलं तर मग!" असं जुईनं म्हटलं.
रोहिणी हट्टंगडी यांचे नाव मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय कलाकारांमध्ये घेतले जाते. त्यांनी अनेक गाजलेल्या चित्रपटांत आणि मालिकांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत. विशेष म्हणजे, १९८२ मध्ये आलेल्या 'गांधी' या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या चित्रपटात त्यांनी कस्तुरबा गांधी यांची भूमिका साकारली होती, ज्यासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा बाफ्टा पुरस्कार (BAFTA Award) मिळाला होता. राष्ट्रीय पुरस्कारांवरही त्यांनी आपले नाव कोरले आहे. रोहिणी हट्टंगडी यांच्या अभिनयाचा अनुभव आणि कामाप्रती असलेली निष्ठा यामुळे 'पूर्णा आजी'च्या भूमिकेला एक नवी किनार मिळेल अशी अपेक्षा आहे. ज्योती चांदेकर यांची जागा घेणे हे मोठे आव्हान असले तरी, रोहिणी हट्टंगडी त्यांच्या अभिनयाच्या बळावर प्रेक्षकांची मने नक्कीच जिंकतील, यात शंका नाही.