माही विजसोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान मिस्ट्री गर्लसोबत दिसला जय भानुशाली, अभिनेत्री भडकली म्हणाली- "आधी..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 11:10 IST2025-12-15T11:09:44+5:302025-12-15T11:10:09+5:30
जय भानुशालीला मिस्ट्री गर्लसोबत स्पॉट करण्यात आलं आहे. त्यामुळे पुन्हा त्यांच्या नात्यात बिनसल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

माही विजसोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान मिस्ट्री गर्लसोबत दिसला जय भानुशाली, अभिनेत्री भडकली म्हणाली- "आधी..."
टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय कपल असलेले जय भानुशाली आणि माही विज यांच्या घटस्फोटाच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. माहीने यावर स्पष्टीकरण देत या अफवा असल्याचं सांगितलं होतं. मात्र तरीही या चर्चांना पूर्णविराम मिळालेला नाही. आता जय भानुशालीला मिस्ट्री गर्लसोबत स्पॉट करण्यात आलं आहे. त्यामुळे पुन्हा त्यांच्या नात्यात बिनसल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
इनस्टाग्रामवर जय भानुशालीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये तो बिग बॉस १५ फेम मायशा अय्यरसोबत दिसत आहे. एका कॉन्सर्टमधील हा व्हिडीओ आहे. ज्यामध्ये जय आणि मायशा एकत्र एन्जॉय करताना दिसत आहेत. जय आणि मायशाचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने पुन्हा जय-माहीच्या घटस्फोटाबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. जयसोबत दिसणारी ही मिस्ट्री गर्ल म्हणजेच मायशासोबत त्याचं काय नातं आहे, याबाबत चर्चा रंगली आहे.
जय भानुशाली आणि मायशा अय्यरच्या व्हिडीओवर आरती सिंहने कमेंट करत त्यांच्या नात्याबाबत भाष्य केलं आहे. "तुम्ही काहीही लिहिताय...ती त्याची बहीण आहे...आधी सत्य जाणून घ्या" असं आरतीने म्हटलं आहे. मिस्ट्री गर्ल मायशा ही जयची बहीण आहे. 'बिग बॉस १५'मध्ये जय आणि मायशा यांच्यात मैत्री झाली होती. तेव्हापासून मायशा जयला राखी बांधते. जय आणि माही हे टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय कपल आहेत. २०१० मध्ये त्यांनी लग्न करत संसार थाटला होता. त्यांनी दोन मुलं दत्तक घेतली होती. त्यानंतर जय आणि माहीच्या आयुष्यात परीचं आगमन झालं. त्यांच्या मुलीचं नाव तारा असं आहे.