"घटस्फोट घ्यायचा होता तर मुलं दत्तक कशाला घेतली?" म्हणणाऱ्यांना माही विजचं सणसणीत उत्तर, म्हणाली- "आमची मुलं..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 16:01 IST2026-01-09T16:00:21+5:302026-01-09T16:01:27+5:30
घटस्फोटानंतर माहीने तिच्या युट्यूबवरून नवीन व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओतून तिने घटस्फोटावर भाष्य करत ट्रोल करणाऱ्यांना सणसणीत उत्तर दिलं आहे.

"घटस्फोट घ्यायचा होता तर मुलं दत्तक कशाला घेतली?" म्हणणाऱ्यांना माही विजचं सणसणीत उत्तर, म्हणाली- "आमची मुलं..."
टेलिव्हिजनचं लोकप्रिय कपल जय भानुशाली आणि माही विज घटस्फोट घेत वेगळे झाले आहेत. लग्नानंतर १४ वर्षांनी जय आणि माहीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला. परस्पर संमतीने घटस्फोट घेतल्याची माहिती त्यांनी सोशल मीडियावरुन चाहत्यांना दिली होती. गेल्या कित्येक दिवसांपासून त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या होत्या. पण, दुर्देवाने यावर शिक्कामोर्तब झाल्याने चाहत्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. माहीसोबत घटस्फोट घेतल्यानंतर नेटकऱ्यांनी जयला ट्रोल केलं होतं. त्यांना माहीने स्पष्ट शब्दांत उत्तर दिलं आहे.
घटस्फोटानंतर माहीने तिच्या युट्यूबवरून नवीन व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओतून तिने घटस्फोटावर भाष्य करत ट्रोल करणाऱ्यांना सणसणीत उत्तर दिलं आहे. "आमचा घटस्फोट झाला असला तरी आमच्यात मैत्रीचं नात कायम असेल. आमच्या दोघांचाही स्वभाव शांत आहे. आम्हाला ड्रामा आवडत नाही. म्हणूनच भांडून वेगळं होण्यापेक्षा आम्ही सहमतीने वेगळं होण्याचा निर्णय घेतला. मला माझ्या पोस्टवर काही कमेंट दिसल्या की घटस्फोटच घ्यायचा होता तर मग मुलं दत्तक कशाला घेतली? मी तुम्हाला सांगू इच्छिते की आमचं बँक अकाऊंट रिकामं झालेलं नाही. आम्ही आमच्या मुलांचा सांभाळ करू शकतो. असं नाही की जयने सगळ्यापासून सुटका करून घेतली आहे किंवा माझ्याकडे पैसे नाहीत असंही नाही. आमची तिन्ही मुलं तसंच आयुष्य जगतील जसं ते आत्तापर्यंत जगत आले आहेत", असं माहीने म्हटलं आहे.
पुढे ती म्हणाली, "मला वाटतं की आमच्या मुलांसाठी आम्ही एक चांगलं उदाहरण आहोत. तुमच्यात गोष्टी ठीक होत नसतील तर त्याचे कोर्टात जाऊन वाईट पद्धतीने वाभाडे काढले पाहिजेत हे गरजेचं नाही. आमच्या मुलांना आमचा अभिमान वाटेल. कारण आम्ही योग्य पद्धतीने वेगळं होण्याचा निर्णय घेतला". जय आणि माही यांनी एकाच मालिकेत काम केलं होतं. तिथेच त्यांचे सूर जुळले. त्यानंतर त्यांनी २०१० मध्ये लग्न करत चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. त्यांना तारा ही गोंडस मुलगी आहे. तर खुशी आणि राजवीर या दोन मुलांना त्यांनी दत्तक घेतलं आहे.