मुलगा झाला हो! मराठमोळी गायिका झाली आई; खास पोस्ट लिहून व्यक्त केला आनंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 08:52 IST2025-12-16T08:47:40+5:302025-12-16T08:52:26+5:30
मराठी आणि हिंदी मनोरंजन विश्व गाजवणारी लोकप्रिय गायिका आई झाली आहे. ती आणि तिच्या पतीने मुलगा झाल्याचा आनंद व्यक्त केला आहे

मुलगा झाला हो! मराठमोळी गायिका झाली आई; खास पोस्ट लिहून व्यक्त केला आनंद
'इंडियन आयडल १२' या लोकप्रिय रिअॅलिटी शोमधून प्रकाशझोतात आलेली गायिका सायली कांबळे (Sayli Kamble) आई झाली आहे. सायलीने १२ डिसेंबर २०२५ रोजी एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. ही आनंदाची बातमी सायलीने सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केली असून, तिच्या चाहत्यांकडून आणि कलाविश्वातील मित्रांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
सायलीने शेअर केली पोस्ट
सायली आणि तिचा पती धवलने सोशल मीडियावर खास पोस्ट लिहून मुलाचं स्वागत केलं आहे. धवल लिहितो, "एक छोटासा चमत्कार, आयुष्यभराचं प्रेम. आम्हाला मुलगा झाला आहे. तुमच्या प्रार्थना आणि आशीर्वादासाठी धन्यवाद." याशिवाय दोघांनीही कॅप्शनमध्ये आनंद व्यक्त केला आहे.
या वर्षाच्या ऑक्टोबर महिन्यात सायलीने पती धवलसोबत ती लवकरच आई होणार असल्याची घोषणा केली होती. त्यावेळी तिने तिच्या डोहाळेजेवणाचे सुंदर फोटो शेअर केले होते. याशिवाय सायलीने तिचे वडील, आई आणि सासू यांच्यासोबतचे खास क्षण सर्वांना दाखवले होते.
सायली तिच्या डोहाळेजेवणाच्या समारंभात पारंपरिक मराठमोळ्या रूपात दिसली होती. हिरवी साडी, फुलांचे दागिने आणि मिनिमल मेकअपमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. या फंक्शनच्या एका व्हिडिओमध्ये ती पती धवलसोबत आनंदाने नाचताना दिसली होती. तिचे वडील आई यावेळी खास डान्स करत सायलीच्या आनंदात सहभागी झाले होते.
विशेष म्हणजे, ऑक्टोबरमध्ये गरोदरपणाच्या आठव्या महिन्यात असूनही सायलीने कामाप्रती निष्ठा दाखवत नवरात्रीच्या कार्यक्रमांमध्ये परफॉर्मन्स करणे सुरूच ठेवले होते. तिच्या सोशल मीडियावरील व्हिडिओंमध्ये ती स्टेजवर लाईव्ह परफॉर्म करताना याशिवाय भक्तीगीते आणि देवीच्या उत्सवाची गाणी गाताना दिसली होती.
'इंडियन आयडल १२'ची यशस्वी स्पर्धक
सायली कांबळे 'इंडियन आयडल १२' च्या टॉप ५ स्पर्धकांमध्ये होती. तिचा सुंदर आवाज आणि कमाल सादरीकरणाबद्दल तिचे खूप कौतुक झाले होते. सायलीच्या 'खटूबा' गाण्याला शोमध्ये पाहुण्या परीक्षक म्हणून आलेल्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी विशेष दाद दिली होती. आता आई झाल्याने आणि आयुष्यात नवीन पाहुणा आल्याने सायलीने आनंद व्यक्त केला आहे.