"पैसे जाऊद्या पण उशीर होण्यापूर्वी टेस्ट करा" कॅन्सरबद्दल बोलताना स्टेजवरच रडली हिना खान
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 17:00 IST2025-02-07T17:00:04+5:302025-02-07T17:00:17+5:30
एका कार्यक्रमात हिना खानने कर्करोगाशी लढताना तिला आलेल्या अडचणींबद्दल सांगितलं.

"पैसे जाऊद्या पण उशीर होण्यापूर्वी टेस्ट करा" कॅन्सरबद्दल बोलताना स्टेजवरच रडली हिना खान
Breast Cancer: टीव्हीवरील 'अक्षरा' म्हणजेच हिना खान सध्या कर्करोगाशी झुंज देत आहे. गेल्या वर्षी तिला स्तनाचा कर्करोग झाल्याचे निदान झाले होते. एवढा गंभीर आजार वाटेला येऊनही तिने हार मानली नाही. ती या गंभीर आजाराला धैर्याने तोंड देत आहे. कर्करोगाच्या उपचारादरम्यान ती इतरांना प्रेरणा देतेय. अलीकडेच जागतिक कर्करोग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात हिना खाननं कर्करोगातून वाचलेल्यांच्या रुग्णांना आणि संघर्षाला सलाम केला.
जागतिक कर्करोग दिन २०२५ निमित्त नर्गिस दत्त फाउंडेशनने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात हिना खानने कर्करोगाशी लढताना तिला आलेल्या अडचणींबद्दल सांगितलं. यावेळी बोलताना हिनानं कर्करोगाच्या वाढत्या प्रमाणाबाबत जागरूकता वाढवणेदेखील म्हत्त्वाचं असल्याचं म्हटलं. बरेच लोक डॉक्टरांनी सुचवलेल्या चाचण्यांकडे दुर्लक्ष करतात, जी नंतर एक मोठी चूक असल्याचं सिद्ध होतं. त्यामुळे कधीही चाचण्या टाळू नका, त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका, असंही तिनं म्हटलं. यावेळी बोलताना ती आपले अश्रू रोखू शकली नाही.
हिना म्हणाली, "सहसा आपणं कॅन्सरबद्दल बोलणं टाळतो. आठ महिन्यांपुर्वी हीदेखील त्यातीलच एक होते. पण, कॅन्सर हा कुणालाही होऊ शकतो. कुठल्या देशात, कुठल्याही व्यक्तीला, गरीब, श्रीमंत असं काही कॅन्सर पाहत नाही. त्यामुळं आपण कॅन्सरबद्दल बोललं पाहिजे. जागरूक असलं पाहिजे. मला असं वाटतं की प्रत्येक सहा महिन्यानंतर टेस्ट केली पाहिजे. कारण मी स्वता: वर्षाला टेस्ट करत होते आणि तरीही मला कॅन्सर झालाय. टेस्ट करण्यासाठी फक्त १५ मिनिटे लागतात. जर कॅन्सरचं निदान पहिल्याचं टप्प्यात झालं, तर अर्धी लढाई आपण तिथेच जिंकतो".
पुढे ती म्हणाली, "जेव्हा तुम्ही टेस्ट करता आणि त्यात काहीचं निघत नाही. तेव्हा तुम्ही म्हणता अरे काहीचं निघालं. पण, तुम्हाला अंदाजाही नाही की तो किती मोठा आनंद आहे. एका कॅन्सर झालेल्या व्यक्तीला विचारा, रिपोर्टमध्ये कॅन्सरचं निदान झाल्यावर काय परिस्थिती ओढावते. उपचार घेणं खूप त्रासदायक असतं. त्यामुळे पैसे जाऊद्या पण टेस्ट करा".
हिना म्हणाली, "कॅन्सरवर आपण मात करु शकतो. आपल्याकडे सुविधा आहेत. कॅन्सरवर उपचार घेण्यासाठी मी विदेशात जाऊ शकले असते. पण, आपल्या भारतात सर्व सुविधा आहेत. जगभरात ज्या प्रकारे एका कॅन्सर झालेल्या व्यक्तीवर उपचार केले जातात, अगदी त्याचप्रकारे भारतात होतात. काही वेगळं नाही. त्यामुळे मी मुंबईत उपचार घेण्याचा निर्णय घेतला".