"नाना घरी असतात तेव्हा..."; नातू अगस्त्यने केली बिग बींची पोलखोल, जया बच्चन यांच्याविषयीही केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 12:09 IST2026-01-02T12:03:52+5:302026-01-02T12:09:29+5:30
अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदाने सर्वांसमोर बिग बीं आणि जया बच्चन यांच्याविषयी खुलासा केला. काय म्हणाला अगस्त्य?

"नाना घरी असतात तेव्हा..."; नातू अगस्त्यने केली बिग बींची पोलखोल, जया बच्चन यांच्याविषयीही केला खुलासा
टेलिव्हिजनवरील अत्यंत लोकप्रिय शो 'कौन बनेगा करोडपती १७' (KBC 17) मध्ये अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदाच्या आगामी 'इक्कीस' (Ikkis) चित्रपटाचे प्रमोशन करण्यात आले. यावेळी अगस्त्यने आपले नाना आणि नानी अर्थात अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्याविषयी कोणाला माहित नसलेल्या खास गोष्टी उघड केल्या. काय म्हणाला अगस्त्य?
अगस्त्यने शोमध्ये येताच सांगितले की, केबीसीच्या हॉटसीटवर बसणे हे त्याच्यासाठी एखाद्या 'पॅरेंट्स-टीचर मीटिंग'सारखे आहे. कारण समोर होस्ट म्हणून त्याचे आजोबा अमिताभ बच्चन बसले होते आणि बाजूला त्याचे दिग्दर्शक श्रीराम राघवन होते. त्यामुळे प्रश्नांची उत्तरे देताना त्याची मोठी तारांबळ उडाली.
घरी असताना आणि सेटवर काम करताना अमिताभ बच्चन यांच्या वागण्यात कसा फरक आहे? हा प्रश्न विचारताच अगस्त्यने मजेशीर उत्तर दिले. तो म्हणाला, "नाना इथे सेटवर खूप हसतमुख आणि मजा-मस्ती करताना दिसतात, पण घरी ते खूप गंभीर असतात. इथे आल्यावर त्यांचा हा वेगळा अवतार बघून मलाही आश्चर्य वाटतंय, मी याचा आनंद घेतोय."
याशिवाय 'कौन बनेगा करोडपती १७' कार्यक्रमात अगस्त्यला आणखी एक प्रश्न विचारण्यात आला. जेव्हा त्याला नाना आणि नानी यांपैकी कोणाला तरी एकाला निवडण्यास सांगण्यात आले. या गोंधळात 'इक्कीस'मधील त्याचा सहकलाकार जयदीप अहलावतने अगस्त्यची फिरकी घेतली.
तो म्हणाला, "जर तुला व्हॅनिटी वॅनमध्ये मार खायचा असेल तर जया बच्चन यांचे नाव घे आणि जर घरी जाऊन मार खायचा असेल तर अमिताभ सरांचे नाव घे!" शेवटी अगस्त्यने मान्य केले की, त्याची नानी म्हणजेच जया बच्चन या घरामध्ये जास्त कडक शिस्तीच्या आहेत.
अमिताभ यांनीही अगस्त्यच्या म्हणण्याला सहमती दर्शवली. 'केबीसी'च्या विशेष भागात 'इक्कीस' चित्रपटाची टीम सहभागी झाली होती. या चित्रपटात दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांनीही काम केले आहे. धर्मेंद्र यांच्या आठवणींनी अमिताभ बच्चन भावूक झाले. हा चित्रपट १ जानेवारी २०२६ रोजी प्रदर्शित झाला असून अगस्त्यने यात परमवीर चक्र विजेते अरुण खेत्रपाल यांची भूमिका साकारली आहे.