'घाशीराम कोतवाल' आता हिंदीत, संजय मिश्रा अन् संतोष जुवेकरची रंगभूमीवर एन्ट्री
By ऋचा वझे | Updated: July 31, 2025 09:54 IST2025-07-31T09:51:00+5:302025-07-31T09:54:33+5:30
नाना फडणवीसांच्या भूमिकेत संजय मिश्रा तर संतोष जुवेकर साकारणार 'घाशीराम'

'घाशीराम कोतवाल' आता हिंदीत, संजय मिश्रा अन् संतोष जुवेकरची रंगभूमीवर एन्ट्री
विजय तेंडुलकर लिखित 'घाशीराम कोतवाल' हे कालातीत नाटक आता हिंदी रंगभूमीवर येत आहे. १९७२ साली 'घाशीराम कोतवाल' या नाटकाने मराठी रसिक प्रेक्षकांना नाट्यगृहात खेचून आणलं होतं. पेशवाईच्या काळात पुण्याचा कोतवाल राहिलेल्या घाशीरामवर हे नाटक आधारित होतं. नाटकाचा विषय पाहता काहीसा वादही झाला होता. मात्र हे नाटकाची लोकप्रियता वाढतच गेली आणि हे नाटक कालातीत बनलं. डॉ जब्बार पटेल यांनी नाटकाचं दिग्दर्शन केलं होतं. आता हेच नाटक पुन्हा रंगभूमीवर येत आहे तेही हिंदीत. भालचंद्र कुबल आणि अभिजीत पानसे यांनी नाटकाचं दिग्दर्शन केलं असून हिंदी अभिनेते संजय मिश्रा (Sanjay Mishra) हे नाना फडवणीस यांच्या भूमिकेत रंगभूमीवर येत आहेत. तर मराठी अभिनेता संतोष जुवेकर (Santosh Juvekar) घाशीराम साकारत आहे.
'घासीराम कोतवाल' (Ghasiram Kotwal) असं या हिंदी नाटकाचं नाव आहे. काल ३० जुलै रोजी बांद्रा येथील बालगंधर्व रंगमंदिर येथे या नाटकासंदर्भात पत्रकार परिषद झाली. नव्या पिढीलाही हे नाटक समजावं अशा पद्धतीने नाटकात काही बदलही करण्यात आल्याची माहिती अभिजीत पानसे यांनी दिली. नाना फडणवीस या भूमिकेसाठी संजय मिश्रा हे नाव एकदम परफेक्ट आहे तर घाशीरामच्या भूमिकेत संतोष जुवेकरच शोभून दिसू शकतो म्हणून त्याची निवड केली असं ते यावेळी म्हणाले. अभिनेत्री उर्मिला कानिटकरचीही यामध्ये भूमिका आहे. वसंत देव यांनी नाटकाचं हिंदीत भाषांतर केलं आहे. नाटकात संगीत आणि नृत्याचा मोठी भूमिका आहे. यासाठी मंदार देशपांडे यांनी संगीत दिलं असून फुलवा खामकरने नृत्य दिग्दर्शन केलं आहे. नाना फडणवीस, संतोष जुवेकर आणि उर्मिलासह आणखी ७० आर्टिस्टचा नाटकात सहभाग आहे. विशेष म्हणजे नाटकावेळी संगीत रेकॉर्डेड नसून लाईव्ह सादर होणार आहे.
'घासीराम कोतवाल' नाटकाची निर्मिती आकांक्षा ओमकार माळी आणि अनिता पालांडे यांनी केली आहे. नाटकाचे नेपथ्य संदेश बेंद्रे, प्रकाशयोजना हर्षवर्धन पाठक, वेशभूषा चैताली डोंगरे व बळवंत काजरोळकर यांनी केली आहे. या नाटकातून संजय मिश्रा आणि संतोष जुवेकर यांची इतर आर्टिस्टसह जुगलबंदी पाहायला मिळणार आहे. नाटकाचा शुभारंभ १४ आणि १५ ऑगस्ट रोजी बालगंधर्व रंगमंदिर, बांद्रा येथे रात्री ८ वाजता होणार आहे.