१५० च्या स्पीडनं कार पळवली, थेट दुभाजकाला धडकवली; Bigg Boss स्पर्धकानं उचललं टोकाचं पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2026 08:46 IST2026-03-08T08:45:23+5:302026-03-08T08:46:25+5:30
जखमी अनुरागला तातडीने मेरठच्या सुभारती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांचे पथक त्याच्यावर उपचार करत आहे.

१५० च्या स्पीडनं कार पळवली, थेट दुभाजकाला धडकवली; Bigg Boss स्पर्धकानं उचललं टोकाचं पाऊल
मेरठ - प्रसिद्ध युट्यूबर आणि बिग बॉस १७ मधील स्पर्धक अनुराग डोभाल, ज्याला 'UK07 रायडर' या नावाने ओळखले जाते, त्याने आत्मघातकी पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला आहे. अनुराग डोभाल याच्या कारचा भयानक अपघात झाला आहे. हा एक अपघात होता की जाणुनबुजून केलेला आत्महत्येचा प्रयत्न होता यावरून सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगली आहे. ही घटना इन्स्टाग्रामवर लाईव्ह स्ट्रिमिंग करताना घडली असून त्यावेळी हजारो लोक त्याचा व्हिडिओ पाहत होते. या लाईव्ह व्हिडिओमध्ये त्याची वेगवान कार दुभाजकाला धडकल्याचे दिसून येते. अनुरागच्या मानसिक स्थितीबाबतही लोकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.
माहितीनुसार, जेव्हा ही घटना घडली तेव्हा अनुराग डोभाल त्याच्या इन्स्टाग्रामवर लाईव्ह करत होता. त्यावेळी अचानक त्याने त्याच्या कारचा वेग वाढवला. पाहता पाहता कारचा स्पीड १५० किमी प्रति तास इतक्यावर पोहचला. याच वेगवान कारने मेरठ एक्सप्रेसवर त्याची कार अनियंत्रित झाली आणि थेट दुभाजकाला धडकली. ही थरारक घटना फॉलोअर्सने लाईव्ह पाहिली. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ माजली. जखमी अनुरागला तातडीने मेरठच्या सुभारती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांचे पथक त्याच्यावर उपचार करत आहे.
Anurag Dobhal (UK07 Rider) came live on Instagram, wherein he could be seen driving his car rashly. Calling it the last ride, Anurag ended the video abruptly, which seemed like a crash. He attempted su!c¡de, however he's safe, and hospitalized currently. pic.twitter.com/bJoLeDQHd5
— BBTak (@BiggBoss_Tak) March 7, 2026
हा माझा अखेरचा व्हिडिओ...
अनुराग डोभाल मागील काही काळापासून कौटुंबिक वादामुळे मानसिक तणावाखाली जगत आहे. इन्स्टाग्राम लाईव्हवेळी अनुरागने असे काही शब्द वापरले ज्याने सगळ्यांना धक्का बसला. अनुराग खूप भावूक दिसत होता. व्हिडिओत तो म्हणाला की, आई, पुढच्या जन्मी मी येईन तेव्हा मला फक्त प्रेम कर...मला प्रेमाची खूप गरज होती. कुणीच नाही माझ्यासोबत, कुणाला फोन करू...त्यानंतर लेट्स गो फॉर द फाइनल ड्राइव्ह असं सांगत त्याने कार आणखी वेगाने पळवली. त्यानंतर ही घटना घडली. या दुर्घटनेनंतर तिथे असलेल्या काही स्थानिकांनी गावकऱ्यांच्या मदतीने अनुरागला कारमधून बाहेर काढले. सध्या पोलीस या घटनेचा तपास करत आहे. हा एक अपघात होता की यामागे जाणुनबुजून केलेला आत्महत्येचा प्रयत्न होता हे शोधले जात आहे.
वैयक्तिक आयुष्यात वादळ
अनुराग डोभालने ४ मार्च रोजी त्याच्या युट्यूब चॅनलवर २ तासांचा व्हिडिओ जारी केला होता. ज्यात त्याने खासगी आयुष्य, कौटुंबिक वाद, लग्न आणि घर सोडण्याची आलेली वेळ, आर्थिक संकट आणि मानसिक तणाव याबाबत सविस्तर भाष्य केले होते. या व्हिडिओत अनेकदा अनुराग भावूक होताना आणि रडताना दिसला. मागील काही वर्षात त्याचे आयुष्य पूर्णपणे बदलले आहे. व्हिडिओत त्याने कौटुंबिक संवाद आणि कॉल रेकॉर्डिंगही शेअर केली. त्या सर्व परिस्थितीतून अनुराग मानसिक तणावातून जात असल्याचे स्पष्ट दिसत होते.