ईशा डे ची फिल्मी लव्हस्टोरी! कॉलेजमध्ये असल्यापासूनच होती अभिषेकच्या प्रेमात; म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2026 17:43 IST2026-04-11T17:42:53+5:302026-04-11T17:43:35+5:30
अभिषेकने मला कॉलेजमध्येच दिलेला सल्ला, नंतर बोलणंच बंद झालं...काय आहे नक्की ही स्टोरी?

ईशा डे ची फिल्मी लव्हस्टोरी! कॉलेजमध्ये असल्यापासूनच होती अभिषेकच्या प्रेमात; म्हणाली...
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री ईशा डे काही दिवसांपूर्वी लग्नबंधनात अडकली. अभिषेक खणकरसोबत तिने साताजन्माची गाठ बांधली. ईशाने थेट लग्न करत असल्याचीच बातमी सांगितली आणि सर्वांना सुखद धक्का दिला. ईशाचा नवरा कोण आहे, काय करतो हे सगळंच आधी गुपित होतं. नंतर अभिषेक खणकरचं नाव समोर आलं. अभिषेक खणकर हा मराठी इंडस्ट्रीतलाच आहे. तो प्रसिद्ध गीतकार आहे. 'खुलता कळी खुलेना' मालिकेचं गीत त्यानेच लिहिलं होतं. शिवाय सध्याच्या 'लक्ष्मी निवास' मालिकेचंही गीत त्यानेच लिहिलं आहे. पण ईशा आणि अभिषेकचं नक्की कधी जुळलं? असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. यावर आता ईशाने उत्तर दिलं आहे.
महाराष्ट्र टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत ईशा डे म्हणाली, "आमची ओळख कॉलेजपासूनचीच आहे. मी ११ वीत गेले आणि त्यावर्षी अभिषेक पास आऊट झाला. आमच्यात पाच वर्षांचं अंतर आहे. मी ज्या एकांकिकेत होते त्याचं संगीत अभिषेक करत होता. मला तो तेव्हापासूनच आवडत होता. हे माझ्या मित्र मैत्रिणींनाही माहित होतं. मग एक दिवस मी त्याचा नंबर मिळवला आणि थेट त्याला फोन करुन मनातलं सांगितलं. तेव्हा तो म्हणाला, 'तू आत्ताच कॉलेजमध्ये आली आहेस. आधी सगळं एक्स्प्लोर कर, नवीन गोष्टी शिक, लगेच प्रेमात पडू नकोस'. त्याने मला असा सल्ला दिला पण मी तरी त्याच्या प्रेमात होते."
ती पुढे म्हणाली, "कॉलेजनंतर मग आमचा फारसा संपर्क नव्हता. आम्ही आपापल्या आयुष्यात पुढे गेलो. पण आमचा वाढदिवस एकच असतो. म्हणून दर वाढदिवसाला आम्ही एकमेकांना मेसेज करायचो आणि सेम टू यु म्हणायचो. तेवढंच काय ते बोलणं व्हायचं. तो हास्यजत्रेचा चाहता आहे. एका स्किटमध्ये त्याने मला गाताना पाहिलं आणि मेसेज केला की, 'बरं गातेस की!'. तिथून मग आम्ही परत बोलायला लागलो. ११ मार्चला आम्ही बोलायला सुरुवात केली. १४ मार्चला भेटलो. मधल्या इतक्या वर्षात आलेले चांगले-वाईट अनुभव शेअर केले. मग आम्हाला खऱ्या अर्थाने कम्पॅनियनशिप म्हणजे काय? याचं उत्तर मिळालं आणि आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नाची तारीखही आम्ही मुद्दामून ११ मार्चच निवडली. घरुनही पाठिंबा होताच. जे आमच्यावर प्रेम करतात तेच लोक लग्नात असावेत असं आम्हाला वाटत होतं. अभिषेक नेहमी म्हणतो की 'मज्जा आली पाहिजे'. म्हणून लग्नाच्या डेकोरेशनमध्ये एन्ट्रीलाच आम्ही 'मज्जा आली पाहिजे' असा बोर्डच लावला होता. तेच झालं, सगळ्यांनी खूप मज्जा केली."