एकता कपूरने सुशांतसिंह राजपूतच्या आठवणीत शेअर केला व्हिडिओ, अंकिता लोखंडेची कमेंट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 17:58 IST2025-01-21T17:58:08+5:302025-01-21T17:58:53+5:30
आज सुशांतसिंह राजपूतचा वाढदिवस. सगळेच त्याच्या आठवणीत भावुक झाले आहेत.

एकता कपूरने सुशांतसिंह राजपूतच्या आठवणीत शेअर केला व्हिडिओ, अंकिता लोखंडेची कमेंट
दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतचा (Sushant singh Rajput) आज वाढदिवस. २०२० साली सुशांतने त्याच्याच घरी गळफास घेत आत्महत्या केली. यानंतर ही आत्महत्या की हत्या हा तपास सुरु झाला होता. सीबीआय, एनसीबी सगळेच यामध्ये आले. सुशांतच्या आत्महत्येचं प्रकरण वेगवेगळ्या वळणाला जात होतं. आजही हे कोडं सुटलेलं नाही. सुशांतच्या बहिणीने भावाला न्याय मिळावा म्हणून खूप प्रयत्न केले. आज त्याच्या वाढदिवशी सगळेच त्याची आठवण काढत आहेत. निर्माती एकता कपूरनेही 'पवित्र रिश्ता' मालिकेतील त्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. यावर अंकिता लोखंडेनेही कमेंट केली आहे.
'पवित्र रिश्ता' मालिकेमुळे घराघरात पोहोचला होता. मालिकेतील अर्चना-मानवची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली. मालिकेची निर्माती एकता कपूरने सुशांतचा व्हिडिओ शेअर करत लिहिले, "जुन्या आठवणी आणि भावना लाटांसारख्या येतात आणि आज कदाचित तसाच एक दिवस आहे...हॅपी बर्थडे, तू जिथे असशील तिथे चमकत राहा, हसत राहा, आमच्या सर्वांसाठीच तू खूप प्रिय आहेस."
एकता कपूरच्या या पोस्टवर अभिनेत्री अंकिता लोखंडेने कमेंट करत लिहिले, 'नेहमी आणि अनंत काळापर्यंत'. चाहतेही कमेंट करत सुशांतच्या आठवणीत भावुक झाले आहेत.
अंकिता आणि सुशांत बरीच वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. मालिकेच्या सेटवरच ते प्रेमात पडले. मात्र नंतर सुशांतच्या बॉलिवूड पदार्पणानंतर काही वर्षातच त्यांच्यात बिनसलं. परिणामी त्यांचा ब्रेकअप झाला. याचा अंकितावर फार परिणाम झाला होता. ती अभिनयापासूनही दूर गेली होती. सुशांतच्या निधनाचा तिला प्रचंड धक्का बसला होता.