'दीया और बाती' फेम अभिनेत्रीने ११ वर्षांचा संसार मोडल्यानंतर घेतला संन्यास, पदरात आहे एक मुलगा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 10:08 IST2025-10-20T10:07:09+5:302025-10-20T10:08:00+5:30
गेल्या काही काळापासून कनिका पडद्यापासून दूर आहे. कनिकाने संन्यास घेतला आहे. ३ वर्षांपूर्वीच कनिकाने संन्यास घेतल्याचं सांगितलं. ११ वर्षांचा संसार मोडल्यानंतर कनिका ओशोंच्या आश्रमात जात संन्यास घेण्याचा निर्णय घेतला.

'दीया और बाती' फेम अभिनेत्रीने ११ वर्षांचा संसार मोडल्यानंतर घेतला संन्यास, पदरात आहे एक मुलगा
'दीया और बाती' फेम अभिनेत्री कनिका महेश्वरी चर्चेत आली आहे. या मालिकेत कनिकाने मीनाक्षी राठीची भूमिका साकारली होती. या मालिकेने तिल प्रसिद्धी मिळवून दिली होती. पण, गेल्या काही काळापासून कनिका पडद्यापासून दूर आहे. कनिकाने संन्यास घेतला आहे. ३ वर्षांपूर्वीच कनिकाने संन्यास घेतल्याचं सांगितलं. ११ वर्षांचा संसार मोडल्यानंतर कनिका ओशोंच्या आश्रमात जात संन्यास घेण्याचा निर्णय घेतला.
ओशोंच्या आश्रमात ६ महिने राहिल्यानंतर कनिकाने निओ संन्यास घेण्याचा निर्णय घेतला. केके एंटरटेनमेंटला दिलेल्या मुलाखतीत तिने याचा खुलासा केला आहे. "ही माझी संन्यास माला आहे भगवान ओशोंची... तीन वर्षांपूर्वी मी त्यांच्याकडून निओ संन्यास घेतला. निओ संन्यास(आधुनिक संन्यास) म्हणजे जसं की मी आता तुमच्याशी बोलत आहे तर माझं पूर्ण लक्ष इथेच आहे. आपण अशाचप्रकारे जीवन जगलो तर त्याचा खूप फरक पडतो", असं कनिका म्हणाली.
तिने पुढे सांगितलं की, "संन्यास घेण्यासाठी तुम्हाला आधी ओशो आश्रमात जावं लागतं. ८-९ दिवसांचा एक कोर्स असतो. ज्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे उपक्रम असतात. त्यानंतर तुमच्यात ही भावना जागृत होते की तुम्हाला याची गरज आहे की नाही... मी जवळपास ६ महिने हे उपक्रम करत होते. माझ्या मैत्रिणीने सुचवलं होतं की आश्रमात जा, तुला चांगलं वाटेल. मी आश्रमात गेले तिथे राहिले, त्यांचा कोर्स पूर्ण केला. त्यानंतर मला वाटलं की मलाही ओशोंची माळा हवी आहे".
कनिकाने घटस्फोटानंतर संन्यास घेण्याचा निर्णय घेतला होता. २०१२ मध्ये कनिकाने तिचा मित्र अंकुर घईसोबत लग्न केलं होतं. पण, लग्नानंतर ११ वर्षांनी त्यांचा संसार मोडला. २०२३मध्ये घटस्फोट घेत ते वेगळे झाले. घटस्फोटाच्या आधी ४ वर्ष ते वेगळे राहत होते. त्यांना एक मुलगा आहे. जो आता कनिकासोबत असतो.