"तुम्हाला नरकात पाठवेन...", रात्री अडीच वाजता फटाके फोडणाऱ्यांवर भडकला 'ठरलं तर मग' फेम अभिनेता, म्हणाला...
By कोमल खांबे | Updated: October 21, 2025 09:41 IST2025-10-21T09:40:52+5:302025-10-21T09:41:17+5:30
रात्री अडीच वाजता फटाके फोडणाऱ्यांवर आता 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्याने संताप व्यक्त केला आहे. अभिनेता चैतन्य सरदेशपांडेने व्हिडीओ शेअर करत रात्री फटाके फोडणाऱ्यांना नरकात पाठवणार असल्याचं म्हटलं आहे.

"तुम्हाला नरकात पाठवेन...", रात्री अडीच वाजता फटाके फोडणाऱ्यांवर भडकला 'ठरलं तर मग' फेम अभिनेता, म्हणाला...
दिवाळीमुळे सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे. दिव्यांची रोषणाई, फराळ आणि रांगोळी यासोबतच दिवाळीत असते ती फटाक्यांची आतिषबाजी. पण, हल्ली दिवसा, रात्री कधीही मोठमोठ्या आवाजाचे फटाके फोडले जातात. मध्यरात्री फटाके फोडल्याने अनेकांची झोपमोड होते. असंच रात्री अडीच वाजता फटाके फोडणाऱ्यांवर आता 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्याने संताप व्यक्त केला आहे. अभिनेता चैतन्य सरदेशपांडेने व्हिडीओ शेअर करत रात्री फटाके फोडणाऱ्यांना नरकात पाठवणार असल्याचं म्हटलं आहे.
या व्हिडीओत तो म्हणतो, "सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा...सगळं मान्य आहे. पण म्हणून रात्री अडीच वाजता कोण फटाके फोडतंय? आणि का? रात्री अडीच ही कोणाची पहाट आहे? भाई तुला उठायचंय तर उठ...रात्री १ वाजता उठ... माझं काहीच म्हणणं नाहीये. अभ्यंगस्नान कर, उटण्याने अंघोळ कर...सुतळी बॉम्बच्या सुतळीने अंग घास मला काहीच घेणंदेणं नाहीये... पण अडीच वाजता नको रे फटाके फोडू. अडीच ही पहाट नसते. तू काय जपानमध्ये जन्माला आलाय का? रात्री अडीच वाजता फटाके फोडले ना त्याच्यामुळेच विराट कोहलीची झोप झाली नाही. दुसऱ्या दिवशी तो आऊट झाला. दिवाळी पहाट आहे म्हणे..."
"मला मान्य आहे की नरकचतुर्दशीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठावं लागतं नाहीतर तुम्ही नर्कात जाता. पण, तुला असं का वाटतंय की अडीच वाजता फटाके फोडून तू नरकात जाणार नाहीस? तू जाणारेस नरकात...तू नाही गेलास तर मी घेऊन जाईन आणि दारापर्यंत सोडून येईन. जर तुला त्यांनी घेतलं नाही तर मी वशिला लावीन... नरकाच्या दारात उभं राहून अशी लाथ घालेन तुला आणि मग ओरडेन हॅपी दिवाली... तेव्हा कळेल...", असंही त्याने पुढे म्हटलं आहे.