दिव्या पुगावकरने सांगितला 'लक्ष्मी निवास' मालिकेतील तिच्या कास्टिंगचा किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 16:25 IST2025-02-08T16:24:35+5:302025-02-08T16:25:13+5:30
Divya Pugaonkar : सध्या मालिकाविश्वात 'लक्ष्मी निवास'चीच सर्वत्र चर्चा सुरु आहे. प्रत्येक व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे. या कुटुंबातली शेंडे फळ म्हणजे जान्हवी. ही भूमिका साकारत असलेली दिव्या पुगावकर हिने संवाद साधताना खूप गोष्टींना उजाळा दिला.

दिव्या पुगावकरने सांगितला 'लक्ष्मी निवास' मालिकेतील तिच्या कास्टिंगचा किस्सा
सध्या मालिकाविश्वात 'लक्ष्मी निवास'(Laxmi Niwas)चीच सर्वत्र चर्चा सुरु आहे. प्रत्येक व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे. या कुटुंबातली शेंडे फळ म्हणजे जान्हवी. ही भूमिका साकारत असलेली दिव्या पुगावकर (Divya Pugaonkar) हिने संवाद साधताना खूप गोष्टींना उजाळा दिला. यावेळी तिने तिच्या या मालिकेच्या कास्टिंगचाही किस्सा सांगितला.
दिव्या पुगावकर म्हणाली की, लक्ष्मी निवास मालिकेसाठी माझी कास्टिंग सर्वात शेवटी झाली होती. माझ्या कास्टिंगचा एक गमतीशीर किस्सा असा आहे, मला ऑडिशनला बोलावण्यात आलं. मी ऑडिशनही दिलं, मग मला कॉल आला की ९९ टक्के तुमची निवड झाली आहे. हे सर्व झालं पण अजून माझं कास्टिंग झाले नव्हतं आणि मला दुसऱ्या दिवशी लक्ष्मी निवासचा पहिला टीझर रिलीज झालेला दिसला. ज्यात एक फॅमिली फोटो दाखवला गेला होता. त्यात अक्षया देवधर स्पष्ट दिसत होती आणि जान्हवीचे पात्र आहे तिथे ही एक मुलगी दिसली, तेव्हा वाटले की काही गोष्टी जुळल्या नसतील म्हणून आपले कास्टिंग नाही झाले. पण मी टीझर पाहून खूप खुश झाले कारण तो खूप छान दिसत होता. थोड्या वेळातच मला निर्माते सुनील भोसले यांचा कॉल आला. मी आधी त्यांचं अभिनंदन केले कारण माझा असा गैरसमज होता की माझे कास्टिंग झाले नाहीये. तेव्हा ते म्हणाले की तूच जान्हवी आहेस, आम्ही प्रोमोसाठी फक्त एका मुलीला बोलावले होते. अशा पद्धतीनी माझे कास्टिंग झाले.
जान्हवीच्या लूकबद्दल
ती पुढे म्हणाली की, मला जान्हवीचा लूकही फार आवडला. जान्हवीच्या लूकच्या खूप लूक टेस्ट झाल्या. आमची कॉश्च्युम डिजायनर आहे, तिने खूप मेहनत घेतली आणि जान्हवीच्या लूकसाठी हे ड्रेस खास बनवून घेतले. जान्हवी कॉटनचे फ्लोअर लेन्थ ड्रेसेस, विथ पफ स्लिव्हस वापरते. मला कॅमेरासमोर ते मिरवायला मिळतात याचा आनंद आहे. मुलींना असे ड्रेसेस आवडतातच. जान्हवीला एक छान ब्रेसलेट दिले आहे जे मुलींना खूप आवडेल.