बिग बींच्या पाया पडल्याने दिलजीत दोसांझ आला अडचणीत, थेट मिळाली धमकी! नेमकं प्रकरण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 15:13 IST2025-10-29T15:11:44+5:302025-10-29T15:13:55+5:30
केबीसीच्या मंचावर गायक-अभिनेता दिलजीत अमिताभ यांच्या पाया पडला. पण त्यामुळे तो चांगलाच अडचणीत सापडलाय. काय घडलं नेमकं?

बिग बींच्या पाया पडल्याने दिलजीत दोसांझ आला अडचणीत, थेट मिळाली धमकी! नेमकं प्रकरण काय?
लोकप्रिय पंजाबी अभिनेता आणि गायक दिलजीत दोसांझ (Diljit Dosanjh) याला सध्या धमकीचा सामना करावा लागला आहे. 'कौन बनेगा करोडपती १७' (KBC 17) या शोमध्ये सहभागी झाल्यावर त्याने ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या पाया पडून आदर व्यक्त केला होता. याच कारणामुळे त्याला 'सिख्स फॉर जस्टिस' (SFJ) या खलिस्तानी दहशतवादी संघटनेकडून धमकी मिळाली आहे.
नेमका वाद काय?
दिलजीत दोसांझ हा 'केबीसी १७' च्या सेटवर अमिताभ बच्चन यांना भेटला, तेव्हा त्याने विनम्रतेने अमिताभ यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतला. ही घटना अनेक चाहत्यांसाठी भावनिक होती, मात्र SFJ या दहशतवादी गटाने या कृतीवर तीव्र आक्षेप घेतला आहे. 'सिख्स फॉर जस्टिस' या गटाचा दावा आहे की, दिलजीतने अमिताभ बच्चन यांचे पाय धरून शीख धर्माच्या शिकवणीचा आणि शीख अस्मितेचा अपमान केला आहे. त्यांच्या मते, एखाद्या शीख व्यक्तीने दुसऱ्या कोणासमोर न झुकता फक्त ग्रंथ साहिब (Guru Granth Sahib) समोरच नतमस्तक व्हायला हवे.
SFJ ने दिलजीतला या चुकीसाठी माफी दिली जाणार नाही, असं म्हटलं असून त्याला धमकी दिली आहे. या गटाने सोशल मीडियाद्वारे एक संदेश जारी केला आहे, ज्यामध्ये दिलजीतला भविष्यात अशी कृती न करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
या धमकी आणि वादामागे १९८४ च्या शीखविरोधी दंगलीचा संदर्भ आहे. काही शीख संघटना आणि शीख माणसं अमिताभ बच्चन यांच्यावर १९८४ च्या दंगलींना प्रोत्साहन देणारी वक्तव्यंं केल्याचा आरोप करतात. त्यामुळे दिलजीतने बच्चन यांच्यासमोर नतमस्तक होणं अनेक गटांना अधिक खटकलं आहे. दिलजीत दोसांझने मात्र या धमकीवर किंवा वादावर अद्याप कोणतीही सार्वजनिक दिलेली नाही. मात्र, या धमकीमुळे पंजाब आणि बॉलिवूडमध्ये मोठी खळबळ उडाली असून दिलजीतच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.