"अजितदादांचे देऊया नारे...", अवधूत गुप्तेने शेअर केलं उपमुख्यमंत्री अजित पवारांचं शेवटचं गाणं, म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 17:25 IST2026-01-28T17:24:34+5:302026-01-28T17:25:27+5:30
अजित पवारांच्या निधनानंतर कलाविश्वातील कलाकारांनी हळहळ व्यक्त केली आहे. लोकप्रिय गायक अवधूत गुप्तेने अजित पवार यांच्यासाठी केलेलं शेवटचं गाणं शेअर करत पोस्ट लिहिली आहे.

"अजितदादांचे देऊया नारे...", अवधूत गुप्तेने शेअर केलं उपमुख्यमंत्री अजित पवारांचं शेवटचं गाणं, म्हणाला...
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आज सकाळी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात दुर्देवी निधन झालं. त्यांच्या अकाली एक्झिटमुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचारासाठी अजित पवार यांच्या आज बारामती येथे सभा होणार होत्या त्या सभांसाठी आज सकाळी अजित पवार हे मुंबईहून विमानाने बारामती येथे येत होते. हे विमान बारामती विमान तळावर उतरत असताना अपघात होऊन जवळच्या शेतात कोसळले. या अपघातात अजित पवार यांच्यासह एकूण पाच जणांचा मृत्यू झाला आहे. अजित पवारांचे अनेक कलाकारांशी चांगले संबंध होते.
अजित पवारांच्या निधनानंतर कलाविश्वातील कलाकारांनी हळहळ व्यक्त केली आहे. लोकप्रिय गायक अवधूत गुप्तेने अजित पवार यांच्यासाठी केलेलं शेवटचं गाणं शेअर करत पोस्ट लिहिली आहे. "दादा.. “अजितदादांचे देऊया नारे..” हे गीत ह्या महापालिका निवडणुकांच्या काळात मी तुमच्यासाठी गायलेलं शेवटचं गीत ठरलं. अगदी ह्या गीता नंतरसुद्धा तुमच्याशी झालेल्या फोनवर तुम्ही केवढं कौतुक केलंत माझं! तेव्हा कुणाला माहीत होतं की ते आपलं बोलणं शेवटंच असणार आहे म्हणून...सनिवडणूक प्रचार गीते (political songs) हा जरी अनुप्रयुक्त कले (applied arts) चा भाग असला तरी, ते बनवणारे गायक-वादक हे कलाकारच असतात आणि कलाकाराला जगण्यासाठी पहिली लागते ती म्हणजे “दाद”.. हे तुम्हाला नीट ठाऊक होतं. म्हणूनच 'मी राष्ट्रवादी- मी महाराष्ट्रवादी', 'राष्ट्रवादी लयभारी', 'अजिंक्य भगिनी अजित भगिनी'.. ह्या आणि अशा अनेक गाण्यानंतर तुम्ही मला भरभरून दाद दिलीत!", असं त्याने म्हटलं आहे.
"आज महाराष्ट्राने एक निष्णात राजकारणी, एक धडाडीचा कार्यकर्ता, एक जाणता नेता, एक लाडका भाऊ.. गमावला आहे. पण त्याचबरोबर आमच्यासारख्या कलाकारांनी एक रसिक श्रोता आणि एक दिलदार आश्रयदाता गमावला आहे हे नक्की! दादा.. जिथे जाताय तिथे सुखी रहा.. ह्याच शुभेच्छा.. हीच श्रद्धांजली!!", असं म्हणत अवधूत गुप्तेने अजित पवारांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
अजित पवार यांनी आपल्या दीर्घ राजकीय कारकिर्दीमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणावर ठसा उमटवला होता. काका शदर पवार यांच्या पावलावर पाऊल ठेवत राजकारणात आलेल्या अजित पवार यांनी सहकार क्षेत्रातून आपल्या कारकीर्दीची सुरूवात केली. पुढे १९९१ मध्ये ते बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले होते. मात्र ते खऱ्या अर्थाने रुळले ते महाराष्ट्राच्या राजकारणात बारामती विधानसभा मतदारसंघातून अजित पवार हे सलग आमदार म्हणून निवडून आले. तसेच अर्थ, नियोजन, जलसंपदा, ऊर्जा अशा प्रमुख मंत्रालयांची जबाबदारी त्यांनी सांभाळली होती. महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्रिपद सर्वाधिक काळ सांभाळण्याचा विक्रम अजित पवार यांच्या नावावर होता. तसेच सध्या राज्यातील सत्ताधारी महायुती सरकारमध्ये अजित पवार हे उपमुख्यमंत्री होते.