"काय कवी, कविता बविता करता की नाही?" हेमांगी कवीनं सांगितली अजित पवारांची हृदयस्पर्शी आठवण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 15:13 IST2026-01-29T15:12:04+5:302026-01-29T15:13:11+5:30

राजकारणापलीकडे जाऊन अजित पवारांचे सर्वसामान्य लोकांशी आणि कलाकारांशी असलेले नाते किती घट्ट होते, याची साक्ष देणारी पोस्ट हेमांगी कवी हिने शेअर केली आहे.

Deputy Cm Ajit Pawar Death Plane Crash Hemangi Kavi Shares Emotional Post | "काय कवी, कविता बविता करता की नाही?" हेमांगी कवीनं सांगितली अजित पवारांची हृदयस्पर्शी आठवण

"काय कवी, कविता बविता करता की नाही?" हेमांगी कवीनं सांगितली अजित पवारांची हृदयस्पर्शी आठवण

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं काल विमान अपघातात निधन झालं.  आज त्यांच्या पार्थिवावर बारामती येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याआधी त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. अजित पवार यांना शेवटचा निरोप देण्यासाठी जनसागर उसळला होता.  मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री हेमांगी कवी हिनं अजित पवारांना श्रद्धांजली अर्पण करत, त्यांच्याविषयीची एक हृदयस्पर्शी आठवण सोशल मीडियावर शेअर केली आहे. "अजितदादांसारखा 'शार्प' स्मृती असलेला आणि तळागाळातील माणसाशी जोडलेला नेता पुन्हा होणे नाही", अशा शब्दांत हेमांगीने आपल्या भावना व्यक्त केल्या.

हेमांगीने पोस्टमध्ये सांगितले की, काल सकाळी ती नेहमीप्रमाणे शूटिंगला गेली होती. मेकअप करून स्क्रिप्ट वाचायला सगळे जमले असतानाच दिग्दर्शक जयंत पवार यांना त्यांच्या आईचा फोन आला. "आईने नाश्ता केला का विचारायला फोन केला असेल" असे हसत म्हणत त्यांनी फोन घेतला. ते हॅलो बोलणार इतक्यात ते म्हणाले "काय!!!?" सगळ्यांचं लक्ष त्यांच्याकडे गेलं. तिथून त्यांनी काय ऐकलं काहीच कळेना. अगदी थोड्या वेळात त्यांनी फोन ठेवला आणि आम्हांला सांगितलं, "अजित पवार गेले". 

हेमांगीनं लिहलं, "आम्ही गोंधळून सगळ्यांनी एकदम विचारलं, "काय, कोण गेलं?". तर ते हताशपणे म्हणाले "अजितदादा पवार". हे ऐकल्यावर आम्हाला जो धक्का बसला तो मी इथं शब्दात सांगूच शकत नाही. आम्ही पटापट आमचे आमचे फोन उघडून सोशल मीडिया पाहू लागलो. कारण आम्ही जे ऐकलं त्यावर आमचा विश्वासच बसत नव्हता. वाटत होतं काहीतरी चुकीचं ऐकलं किंवा काहीतरी नावाचा गोंधळ झाला असेल? फेक न्यूज असेल पण सगळ्या सोशल मीडियावर अजितदादांच्या मृत्यूच्या बातम्या दिसू लागल्या. धक्कादायक म्हणजे काय हे काल पुन्हा प्रकर्षाने जाणवलं. आणि ज्याप्रकारे मृत्यू झालाय ते तर आणखी भीषण आहे. आज हे सगळं लिहिताना सुद्धा मला नीट प्रोसेस झालेलं नाहीये". 

हेमांगीने १० वर्षांपूर्वीचा एक किस्सा शेअर केला आहे. तिनं लिहलं, "१० वर्षांपूर्वीची गोष्ट मी एका कार्यक्रमासाठी गेले होते. तिथे अजित पवारांसोबत इतरही नेते सुद्धा आले होते. कार्यक्रम संपता संपता आम्हा कलाकारांना ग्रृप फोटोसाठी स्टेजवर बोलवलं. कार्यक्रम शासकीय असल्यामुळे सगळे प्रोटोकॉल सांभाळून फोटो काढले जात होते. पण स्टेजवर ही गर्दी झाली. ग्रृप फोटोमध्ये सगळे नीट मावावेत म्हणून आम्ही सगळे कलाकार फोटोसाठी रेषेत पुढे उभे राहीलो, आमच्या मागे VIPs. तेवढ्यात मागून आवाज आला "काय कवी" मी आश्चर्याने मागे वळून पाहिलं तर माझ्या अगदी मागे दादा उभे होते. मी दचकून म्हणाले "Sir तुम्ही?" मला त्यांना विचारयचं होतं "तुम्हांला माझं नाव कसं माहीत?" हे विचारणार तेवढ्यात दादाच म्हणाले "अडनाव कवी आहे तर काय कविता बविता करता की नाही?" मी हसून नाही म्हटलं. "मी फक्त नावाची कवी आहे". त्यावर त्यांनी विचारलं "आडनाव कवी कसं काय" मग मी थोडक्यात त्यांना सांगितलं. 

तिनं लिहलं, "बरं समोर फोटो काढणं सुरुच होतं. मग मागून कुणीतरी म्हटलं "तुम्ही पुण्याच्या का?" मी 'नाही' बोलणार इतक्यात दादाच म्हणाले… "अरे त्या 'माण' तालुक्याच्या आहेत…जयकुमार गोरेच्या गावच्या!" हे सगळं ऐकून मला आता फक्त चक्कर यायची बाकी होती. मी  फोटो सोडून अजितदादांकडे बघत राहिले. तर ते त्यांची छानसं हास्य  देत सगळ्यांसोबत फटो काढत होते. फोटो काढण्याचा कार्यक्रम झाला आणि ते आम्हा सगळ्यांना त्यांच्या विशेष style मध्ये left मनगटात काळ्या पट्ट्याचं घड्याळ घातलेल्या हातानं sharp असा नमस्कार करत 'चला' म्हणत तरतरतर निघून गेले". 

पुढे तिनं लिहलं, "घरी येऊन मी ही घटना माझ्या बाबांना सांगितली. मी म्हटलं एवढा मोठा, व्यस्त माणूस माझ्या सारख्या लहान कलाकाराचं नाव कसं लक्षात ठेवतो, Pappa? मी कुठली याचे details ही त्यांना कसे माहीत! त्यावर बाबा म्हणाले "चांगला नेता कायम तळागळ्यातल्या लोकांशी हा असा आपला connect ठेवतो. नावं, details लक्षात ठेवतो. त्यांच्या काकांसारखीच म्हणजे शरद पवारांसारखीच त्यांची memory sharp आहे. मोठ्या नेत्याचं हेच ते लक्षण. उगाच नाही ते उपमुख्यमंत्रीएत!" त्यानंतर अजितदादा मला अगदी ४-५ वेळाच भेटले पण प्रत्येक वेळी त्यांच्या मिश्किल smile ने "काय कवी" म्हणून हाक मारली. काल दिवसभर आणि आताही त्यांचं ते "काय कवी" माझ्या कानात घुमत आहे. सामान्य माणसाशी सहज connect असलेला नेता, माणूस, दादा गेला!  Not done दादा, not done!", या शब्दात तिनं आपल्या भावना व्यक्त केल्या.


 

Web Title : हेमांगी कवि ने अजित पवार के साथ बिताई यादगार लम्हों को साझा किया

Web Summary : अभिनेत्री हेमांगी कवि ने अजित पवार की असाधारण स्मृति और आम लोगों के साथ जुड़ाव की कहानी साझा की। उन्होंने एक दशक पहले की एक घटना को याद किया, जहाँ पवार को उनका नाम और विवरण याद था, जो लोगों के साथ जुड़ने की उनकी क्षमता को दर्शाता है।

Web Title : Hemangi Kavi Shares Heartfelt Memory of Ajit Pawar's Personal Touch

Web Summary : Actress Hemangi Kavi shared a touching story about Ajit Pawar's remarkable memory and connection with common people. She recalled an incident where Pawar remembered her name and details from a decade ago, showcasing his ability to connect with people.