"मी अजित पवारांची आवडती गाणी दोन तास गात होतो...", राहुल वैद्यने शेअर केला जय पवारांच्या लग्नातील व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 18:16 IST2026-01-28T18:15:33+5:302026-01-28T18:16:09+5:30
डिसेंबर महिन्यातच अजित पवार यांचा धाकटा लेक जय पवारचा लग्नसोहळा बहरीनमध्ये पार पडला होता. राहुल वैद्यने या लग्नसोहळ्यात लाइव्ह परफॉरमन्स दिला होता. अजित पवारांच्या निधनानंतर राहुल वैद्यने लग्नसोहळ्यातील हा व्हिडीओ शेअर केला आहे.

"मी अजित पवारांची आवडती गाणी दोन तास गात होतो...", राहुल वैद्यने शेअर केला जय पवारांच्या लग्नातील व्हिडीओ
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आज सकाळी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात दुर्देवी निधन झालं. त्यांच्या अकाली एक्झिटमुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचारासाठी अजित पवार यांच्या आज बारामती येथे सभा होणार होत्या त्या सभांसाठी आज सकाळी अजित पवार हे मुंबईहून विमानाने बारामती येथे येत होते. हे विमान बारामती विमान तळावर उतरत असताना अपघात होऊन जवळच्या शेतात कोसळले. या अपघातात अजित पवार यांच्यासह एकूण पाच जणांचा मृत्यू झाला आहे. अजित पवारांचे अनेक कलाकारांशी चांगले संबंध होते.
अजित पवारांच्या निधनानंतर कलाविश्वातील कलाकारांनी हळहळ व्यक्त केली आहे. डिसेंबर महिन्यातच अजित पवार यांचा धाकटा लेक जय पवारचा लग्नसोहळा बहरीनमध्ये पार पडला होता. या लग्नसोहळ्याला अनेक सेलिब्रिटीही हजर होते. राहुल वैद्यने या लग्नसोहळ्यात लाइव्ह परफॉरमन्स दिला होता. अजित पवारांच्या निधनानंतर राहुल वैद्यने लग्नसोहळ्यातील हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत राहुल "ओ मेरे दिल के चैन..." हे गाणं गाताना दिसत आहे. तर अजित पवार मंत्रमुग्ध होऊन ते ऐकताना दिसत आहेत. हा व्हिडीओ शेअर करत त्याने अनुभव शेअर केला आहे. "६ डिसेंबर २०२५ चा हा व्हिडीओ आहे. अजित दादा तब्बल २ तास एका मागोमाग एक त्यांची फेव्हरेट गाणी गाण्यासाठी मला विनंती करत होते. ती भेट शेवटची असेल असा कधी विचारही केला नव्हता. अजित दादा खूप लवकर गेलात...तुम्ही कायम आठवणीत राहाल. तुमच्या आत्म्याला शांती लाभो, दादा ओम शांती", असं त्याने पोस्टमध्ये म्हटलं आहे.
अजित पवार यांनी आपल्या दीर्घ राजकीय कारकिर्दीमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणावर ठसा उमटवला होता. काका शदर पवार यांच्या पावलावर पाऊल ठेवत राजकारणात आलेल्या अजित पवार यांनी सहकार क्षेत्रातून आपल्या कारकीर्दीची सुरूवात केली. पुढे १९९१ मध्ये ते बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले होते. मात्र ते खऱ्या अर्थाने रुळले ते महाराष्ट्राच्या राजकारणात बारामती विधानसभा मतदारसंघातून अजित पवार हे सलग आमदार म्हणून निवडून आले. तसेच अर्थ, नियोजन, जलसंपदा, ऊर्जा अशा प्रमुख मंत्रालयांची जबाबदारी त्यांनी सांभाळली होती. महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्रिपद सर्वाधिक काळ सांभाळण्याचा विक्रम अजित पवार यांच्या नावावर होता. तसेच सध्या राज्यातील सत्ताधारी महायुती सरकारमध्ये अजित पवार हे उपमुख्यमंत्री होते.