अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 19:35 IST2025-08-28T19:34:48+5:302025-08-28T19:35:44+5:30

अथर्व सुदामेनंतर डॅनी पंडित हिंदू-मुस्लीम एकतेचा संदेश देणारी एक रील इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.

Danny Pandit Shares New Video On Hindu Muslim Unity Ganeshotsav Amid Atharva Sudame Controversy | अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश

अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश

सोशल मीडियावर प्रसिद्ध इन्फ्लुएन्सर अथर्व सुदामे (Atharva Sudame) याने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या एका व्हिडीओमुळे सध्या वाद सुरू झालाय. नेटकऱ्यांनी केलेल्या ट्रोलिंगनंतर सुदामे याने व्हिडीओ डिलिट करत माफी मागितली. अथर्व सुदामेनंतर आता प्रसिद्ध रीलस्टार डॅनी पंडितने शेअर केलेल्या व्हिडीओची चर्चा होत आहे. हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश देणारा डॅनी पंडितचा व्हिडीओ व्हायरल होतोय. 

गणेशोत्सवाच्या काळात डॅनी पंडितने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये हिंदू आणि मुस्लिम समाजातील ऐक्याचा सुंदर संदेश देण्यात आला आहे. या व्हिडीओने लोकांची मनं जिंकली आहेत आणि त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.

डॅनीने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये दिसतं की, त्याचे कुटुंब गणपती बाप्पाची आरती करतंय. यावेळी त्यांच्यासोबत एक शेजारची मुस्लीम मुलगी झोयादेखील भक्तिभावाने आरती करत असते. यावेळी तिच्या आईनंं आवाज दिल्यानंतर ती आरती सोडून दरवाजातून बाहेर जाते. हे पाहून सर्वांना थोडं वाईट वाटतं. पण काही क्षणात ती झोया परत येते, तेव्हा तिच्या हातात एक ताट असते. जेव्हा डॅनी ताट उघडून पाहतो, तर त्यात बाप्पासाठी उकडीचे मोदक असतात. झोया म्हणते की, हे मोदक तिच्या 'अम्मीने' बाप्पासाठी खास प्रसाद म्हणून पाठवलेत. व्हिडीओच्या शेवटी, झोयाची आई स्वतः घरी येऊन सर्वांना प्रसाद देते, असं दिसतं. 

काही दिवसांपूर्वी अथर्व सुदामेच्या एका व्हिडीओवर टीका झाल्यानंतर, डॅनीच्या या व्हिडीओला नेटकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. अनेकांनी त्याच्या या प्रयत्नाचे कौतुक केले आहे. अभिनेता सारंग साठेनंदेखील त्याच्या या रीलवर रेड हॉर्ट इमोजी पोस्ट केलेत. काही युजर्सनी कमेंट करत म्हटले आहे की, "डॅनी सलाम आहे तुला", "गणेशोत्सव... ऐक्य एकता... यासाठीच सुरू झाला होता...", "खूप सुंदर व्हिडीओ"
अशा कमेंट केल्यात.


अथर्व सुदामेच्या व्हिडीओमध्ये काय होतं?
अथर्व सुदामेने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. ज्यात दिसतं की, तो गणपतीची मूर्ती घ्यायला जातो, यावेळी त्याला मूर्तीकार मुस्लिम असल्याचे कळते. यावेळी तो मूर्तीकार तुम्हाला दुसरीकडून मूर्ती घ्यायची असेल तर घ्या असं सांगतो. मूर्तीकाराला वाटतं की, अथर्व सुदामे मूर्ती खरेदी करेल की नाही? पण, अथर्व सुदामे तुमच्याकडूनच मूर्ती घ्यायची आहे, असं मूर्तीकाराला सांगतो. अथर्व सुदामे मूर्तीकाराशी बोलताना म्हणतो की, "माझे वडील सांगतात की, आपण साखर व्हावं, जी खीरही बनवते आणि शीरखुर्माही… तसेच आपण वीट व्हावं जी वीट देवाळातही लावली जाते आणि मशिदीमध्ये देखील…".  हा व्हिडीओ अपलोड केल्यानंतर सोशल मीडियावर जोरदार प्रतिक्रिया सुरू झाल्या. सुदामे याला ट्रोल करण्यात आले आहे. काही वेळानंतर सुदामे याने हा व्हिडीओ डिलिट केला.

डॅनी पंडित कोण आहे?

डॅनी पंडितचे खरे नाव मुकेश पंडित आहे, पण तो सोशल मीडियावर डॅनी याच नावाने ओळखला जातो. डॅनी एक युट्यूबर, कंटेट क्रिएटर आणि इन्स्टाग्राम इन्फ्लूएनसर आहे. तो काही वेब सीरिजमध्येही झळकला आहे. सध्या 'नॉर्मल डे विथ डॅनी पंडित- ए डॅनी पंडित लाइव्ह शो' या त्याच्या लाइव्ह कार्यक्रमाचे प्रयोग सुरू आहे. हा शो हाऊसफुल झाल्याचे त्याने अलीकडेच पोस्ट शेअर करत सांगितलं होतं. डॅनी हा वकील आहे. त्याने बी. कॉम आणि एलएलबीबरोबरच कंपनी सेक्रेटरीचंही शिक्षण घेतलेलं आहे.

Web Title: Danny Pandit Shares New Video On Hindu Muslim Unity Ganeshotsav Amid Atharva Sudame Controversy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.