Bigg Boss Marathi 2 : तक्रार मागे, बिग बॉसच्या घरात पुन्हा परतणार का अभिजीत बिचुकले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2019 10:03 IST2019-06-25T10:02:49+5:302019-06-25T10:03:52+5:30
‘बिग बॉस मराठी2’चा स्पर्धक अभिजीत बिचुकले याचा पुन्हा बिग बॉसच्या घरात दाखल होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. होय, खंडणीप्रकरणात फिर्यादीने स्वत:च तक्रार मागे घेतली आहे.

Bigg Boss Marathi 2 : तक्रार मागे, बिग बॉसच्या घरात पुन्हा परतणार का अभिजीत बिचुकले?
‘बिग बॉस मराठी2’चा स्पर्धक अभिजीत बिचुकले याचा पुन्हा बिग बॉसच्या घरात दाखल होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. होय, खंडणीप्रकरणात फिर्यादीने स्वत:च तक्रार मागे घेतली आहे. चेक बाऊन्स प्रकरणात त्याला आधीच जामीन मिळाला होता. त्यामुळे अभिजीत बिचुकलेचा बिग बॉसमध्ये परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
माझी अभिजीत बिचुकलेविरोधात कोणतीही तक्रार नाही, असे बिचुकलेविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करणा-या फिर्यादीने स्वत:हून न्यायालयात लिहून दिले. या प्रकरणात बिचुकलेला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यापूर्वी चेक बाऊन्स प्रकरणात बिचुकलेला अटक झाली होती. बिग बॉसच्या सेटवरूनच सातारा पोलिसांनी त्याला अटक केली होती. अटकेवेळी बिचुकलेने कुठलाही विरोध न करता, स्वत:ला पोलिसांच्या ताब्यात दिले होते.याप्रकरणी बिचुकलेला जामीन मंजूर झाला होता. पण यानंतर खंडणी प्रकरणात त्याला पुन्हा अटक झाली होती. पण आता फिर्यादीनेच ही तक्रार मागे घेतली आहे. अशात बिचुकले पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरात परततो की नाही, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
राजकीय नेते म्हणून बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेणा-या अभिजीत बिचुकलेनी अख्ख्या स्पर्धकांना जोरदार टक्कर दिली. घरातील वादांमुळेही तो चर्चेत राहिला. त्याचा या घरातील वावर त्याच्या फॅन्सना चांगलाच आवडत होता. दरम्यान जुन्या प्रकरणात मला अटक करण्यामागे एक राजकीय षडयंत्र असल्याचा दावा बिचुकलेने केला होता.
अभिजीत बिचुकलेने एबीपी माझाशी नुकताच संवाद साधला होता. मी गेल्या १२ वर्षांपासून वकील संदीप संकपाळ यांचा भाडेकरू आहे. त्यांनी माझ्याकडून भाड्याचे पैसे घेतले होते. पण आता ते ही गोष्ट मान्य करत नाहीयेत. त्यांनी २०१५ मधील एक जुनी केस उकरून काढली असून कोर्टाची दिशाभूल करून माझ्याविरोधात अटक वॉरंट काढला आहे. यात नक्कीच राजकीय हस्तक्षेप असून राजकीय स्वार्थासाठी माझा उपयोग केला जात आहे. माझ्याविरोधात त्यांना भडकवले गेले असून याचा सोक्षमोक्ष लवकरच लागेल, असे बिचुकले म्हणाला होता.