हास्यजत्रेच्या मंचावर कॉमेडी किंग जॉनी लीवरची एंट्री, विनोदी स्टाईलने रसिकांनाही हसवून-हसवून करणार लोटपोट
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2021 14:55 IST2021-07-15T14:47:46+5:302021-07-15T14:55:08+5:30
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा सगळ्यांचा लाडका कार्यक्रम १८ जुलैपासून 'रविवारची हास्यजत्रा' या नावाने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या कार्यक्रमाने प्रेक्षकांच्या मनाला गारुड घातलं केलं आहे.

हास्यजत्रेच्या मंचावर कॉमेडी किंग जॉनी लीवरची एंट्री, विनोदी स्टाईलने रसिकांनाही हसवून-हसवून करणार लोटपोट
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमानी प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. ही हास्यजत्रा सगळ्यांच्या टेन्शनवरची मात्रा ठरली आहे. कार्यक्रमाच्या पहिल्या भागापासून हास्यजत्रेला प्रेक्षकांचं प्रेम मिळू लागलं. ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानी सुरुवातीलाच समीर चौघुले, विशाखा सुभेदार आणि प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव ह्या अफलातून विनोदवीरांच्या दोन जोड्या महाराष्ट्राला मिळाल्या.
नव्या-जुन्या विनोदवीरांच्या एकत्रित सादरीकरणानी यातल्या सर्वच कलाकारांना आणि विनोदवीरांच्या सर्व जोड्यांना महाराष्ट्रानी डोक्यावर घेतलं आहे. अरुण कदम, पंढरीनाथ कांबळे, प्रभाकर मोरे ह्या अनुभवी विनोदवीरांबरोबर गौरव मोरे, वनिता खरात, ओंकार भोजने, श्यामसुंदर राजपूत, शिवाली परब, प्रियदर्शिनी इंदलकर, रसिका वेंगुर्लेकर, निखिल बने, दत्तू मोरे, निमिष कुलकर्णी हे सर्व कलाकार आज मराठी रसिकांचे लाडके झाले आहेत.
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा सगळ्यांचा लाडका कार्यक्रम १८ जुलैपासून 'रविवारची हास्यजत्रा' या नावाने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या कार्यक्रमाने प्रेक्षकांच्या मनाला गारुड घातलं केलं आहे. प्रेक्षकांचं अधिकाधिक मनोरंजन व्हावं यासाठी आता रविवारी २ तास हास्यजत्रा पाहायला मिळणार आहे. या कॉमेडी शोमधून रसिकांना खळखळून हसवायला तसंच त्यांची सगळी दुःख विसरायला लावणारा आणि तुफान मनोरंजन करणारा कॉमेडी किंग दस्तुरखुद्द जॉनी लीवर येणार आहेत. जॉनी लिव्हरच्या उपस्थिती नक्कीच रसिकांसाठी मनोरंजनाची ट्रीटच ठरणार आहे.
जॉनी लिव्हर यांना नम्रता साकारत असलेलं लॉली हे पात्र अतिशय आवडतं आणि त्या पात्रासाठी त्यांनी नम्रताचं कौतुकही केलं. कॉमेडी किंग येणार आणि मंचावर येणार नाहीत असं कसं शक्य आहे. या भागात हास्याच्या मंचावर कॉमेडी किंग जॉनी लिव्हर यांची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळेल. सर्व स्किट्स पाहून त्यांना अतिशय आनंद झाला आणि एवढंच नाही तर त्यांनी सर्व कलाकारांचं आणि हास्यजत्रेचं तोंडभर कौतुक केलं. जॉनी लिव्हर विनोदी स्टाईलने रसिकांनाही हसवून-हसवून लोटपोट करणार आहेत.