ढाब्यावरुन अपहरण, २० लाखांची मागणी अन्..; कॉमेडियन सुनील पाल यांनी सांगितलं नेमकं काय घडलेलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 10:41 IST2024-12-05T10:40:19+5:302024-12-05T10:41:29+5:30
सुनील पाल यांचं अपहरण झाल्यावर त्यांनी मीडियाशी संवाद साधल्यावर त्यांच्यासोबत नेमकं काय घडलं ते सांगितलं

ढाब्यावरुन अपहरण, २० लाखांची मागणी अन्..; कॉमेडियन सुनील पाल यांनी सांगितलं नेमकं काय घडलेलं
कॉमेडियन सुनील पाल मंगळवारी (३ डिसेंबर) अचानक बेपत्ता झाले त्यामुळे सर्वांना धक्का बसला. बेपत्ता झाल्यावर सुनील पाल यांचं अपहरण झाल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या. सुनील पाल यांच्या पत्नीने पोलिसांत तक्रार केल्यावर पोलिसांनी सुनील यांच्याशी संपर्क साधला. सुदैवाने अवघ्या काही तासांत सुनील यांच्याशी पोलिसांचा संपर्क झाला आणि त्यांना सुखरुप घरी आणण्यासाठी पोलिसांची टीम रवाना झाली. अखेर सुनील यांनी घरी आल्यावर एका मुलाखतीत त्यांच्यासोबत नेमकं काय झालेलं, याचा खुलासा केलाय.
सुनील पाल यांच्यासोबत नेमकं काय घडलं?
सुनील News18 ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले की, "हरिद्वार येथे माझा एक शो बूक होता. त्यामुळे मी फ्लाइट पकडून हरिद्वारला पोहोचलो. जी गाडी मला घ्यायला येणार होती त्या गाडीच्या ड्रायव्हरने मला एका ढाब्याजवळ सोडलं. तिथे एक वेगळी गाडी आली आणि त्या गाडीत मला जबरदस्ती बसवण्यात आलं. माझ्या डोळ्यावर पट्टी बांधण्यात आली. तिथून एक-दीड तास ती गाडी चालत होती. त्यानंतर मला एका खोलीत नेलं आणि माझ्या डोळ्यावरची पट्टी काढण्यात आली. आम्ही किडनॅपर आहोत, अशी त्या माणसांनी स्वतःची ओळख सांगितली."
सुनील पुढे म्हणाले, "जर तुम्ही आम्हाला पैसे दिले तरच तुम्हाला आम्ही सोडू. नाही दिले तर तुम्हाला मारून दरीत फेकून देऊ. मी कलाकार असल्याने जास्त पैसे कमावत असेल असं गृहीत धरुन त्यांनी २० लाखांची मागणी केली. मी त्यांना २० लाख देऊ शकत नाही असं सांगितलं. परंतु जीव वाचवण्यासाठी १० लाख देण्याचं कबूल केलं. ते राजी झाले. तेव्हा त्यांनी माझ्याकडे क्रेडीट कार्ड मागितलं. माझ्याकडे ते नव्हतं. त्यानंतर फोनवरुन त्यांनी मला पैसे मागवण्यासाठी सांगितलं."
सुनील पाल शेवटी म्हणाले की, "मी मग सर्वांना फोन करायला सुरुवात केली. कसंतरी ७.५ लाख रुपये मी त्यांना दिले. किडनॅपर लोक त्या पैशात राजी झाले. त्यानंतर त्यांनी मला मेरठ येथील रस्त्यावर सोडलं. तिथून ऑटो पकडून मी गाझियाबादला पोहोचलो. तिथून दिल्ली एअरपोर्टला येऊन फ्लाइट पकडून मुंबईला आलो." अपहरण करणाऱ्या लोकांनी सुनील पाल यांच्याशी बनावट नावाचा वापर करत संपर्क साधून त्यांना जाळ्यात अडकवलं, असं ते म्हणाले.