डीडी वाहिनीनंतर आता या वाहिनीवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार 'महाभारत'
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2020 18:47 IST2020-05-04T18:45:15+5:302020-05-04T18:47:45+5:30
महाभारत ही मालिका प्रेक्षकांना आजपासून आणखी एका वाहिनीवर पाहायला मिळणार आहे.

डीडी वाहिनीनंतर आता या वाहिनीवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार 'महाभारत'
देशभरातल्या लॉकडाऊनमुळे सगळेच लोक आपपल्या घरात बंदिस्त आहेत. कोरोनाने जगभरात थैमान घातल्यामुळे या संकटातून बाहेर कसे पडायचे याचीच धडपड सुरू आहे. लोकांनी घरीच राहून या संकटातून बाहेर पडण्यासाठी मदत करावी असे सगळेच लोक सांगत आहेत. सध्या लोक घरी राहून आपल्या कुटुंबियांसोबत वेळ घालवत आहेत. लोकांचे घरी राहून मनोरंजन व्हावे या हेतूने विविध वाहिन्या प्रयत्न करत आहेत.
अनेक वाहिन्यांवर जुने कार्यक्रम दाखवले जात असून या कार्यक्रमांना प्रेक्षक देखील खूपच चांगला प्रतिसाद देत आहेत. डीडी वाहिनीवर प्रेक्षकांना त्यांची आवडती महाभारत ही मालिका सध्या पाहायला मिळत आहे. या वाहिनीनंतर आता आणखी एका वाहिनीने ही मालिका दाखवण्याचा निर्णय घेतला आहे. महाकाव्य महाभारताचे निवेदन आणि त्याचे आपल्या जीवनात आजही महत्व आहे तसेच त्यातून आपल्याला जगण्याच्या कलेविषयी शिकवण मिळते. अनेक रेकॉर्ड तोडणारा हा प्रसिद्ध पौराणिक शो आता कलर्सवर सुरू होण्यासाठी सज्ज झाला आहे. आजपासून दररोज संध्याकाळी 7-9 या वेळात महाभारत प्रेक्षकांना कलर्सवर पाहायला मिळणार आहे.
नितीश भारद्वाज, मुकेश खन्ना, रुपा गांगुली, गजेंद्र चौहान आणि पुनित इस्सार या कलाकारांनी महाभारतात मुख्य भूमिका साकारल्या होत्या तर रवी चोप्रा यांनी या कार्यक्रमाचे दिग्दर्शन केले होते. महाभारत पहिल्यांदा 1988-90च्या दरम्यान प्रेक्षकांना पाहायला मिळाले होते... त्या काळात हा कार्यक्रम प्रसारित होत असताना रस्ते सुनसान होत असत. अनेक वर्षांनंतरसुद्धा या शोची लोकप्रियता कायम आहे. संपन्न कथा, भव्यता, आणि सुंदर अभिनय यामुळे या कार्यक्रमाने आपल्या जीवनात एक स्मरणीय जागा कायम ठेवली आहे.