"छोटं मोठं काम केलं पण अभिनयाचे तारे तोडले नाहीत..."; कुशल बद्रिकेची नवीन वर्षात खास पोस्ट, होतंय कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 12:16 IST2026-01-01T12:15:16+5:302026-01-01T12:16:13+5:30
अभिनेता कुशल बद्रिकेने सोशल मीडियावर नवीन वर्षानिमित्त खास पोस्ट लिहिली आहे. ही पोस्ट वाचून तुम्हीही आनंदी व्हाल

"छोटं मोठं काम केलं पण अभिनयाचे तारे तोडले नाहीत..."; कुशल बद्रिकेची नवीन वर्षात खास पोस्ट, होतंय कौतुक
'चला हवा येऊ द्या' फेम अभिनेता कुशल बद्रिके हा सोशल मीडियावर सक्रीय असतो. कुशल त्याच्या आयुष्याबद्दलचे विविध अपडेट्स शेअर करताना दिसतो. कुशलने सरत्या वर्षाला निरोप देताना सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट सर्वांना आवडली असून अनेकांनी कुशलच्या लिखाणाचं कौतुक केलं आहे. कुशलने या पोस्टमध्ये काय लिहिलंय?
कुशल बद्रिके पोस्ट करुन लिहितो की, ''ट्रेन मधे बसल्या बसल्या एक स्टेशन जातं आणि दुसरं येतं ना, तितक्या सहज 2025 गेलं आणि 2026 आलं. ह्या सरत्या वर्षात मी काही खतरनाक असं केलं नाही राव. म्हणजे छोटं मोठं काम केलं, पण अभिनयाचे तारे बिरे तोडले नाहीत. एखादं अवार्ड बिवार्ड मिळवून, माझ्यातल्या कलेला नवी कलाटणी बिलाटणी दिली नाही. खरं सांगतो, पापण्यांना ओझं होईल अशी स्वप्न मी पाहिली नाहीत.''
''करीयरच्या मृगजळामागे उर फुटेस्तोवर धावलो नाही. आपण श्वास घेतो आणि सोडतो ना, तितका सहज जगलो हे वर्ष. ते मोठे मोठे फिलोसोफर्स म्हणतात ना, “just breathe” — तसं जगून पाहिलं हे वर्ष. असंही कधी कधी छान वाटतं राव. जन्माला आल्यासारखं, जरा जगून घेतल्यासारखं वाटतं राव.'', अशाप्रकारे कुशल बद्रिकेने पोस्ट लिहिली आहे. सोनाली कुलकर्णी आणि कुशलच्या सहकाऱ्यांनी या पोस्टला चांगलीच पसंती दर्शवली आहे.