'क्योंकि सास भी कभी बहू थी २'मध्ये बिल गेट्स यांची एन्ट्री, पाहा धमाकेदार प्रोमो
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 14:30 IST2025-10-24T14:29:13+5:302025-10-24T14:30:11+5:30
प्रसिद्ध टीव्ही मालिका 'क्योंकि सास भी कभी बहू थी २' मध्ये मायक्रोसॉफ्टचे संस्थापक आणि जगप्रसिद्ध अब्जाधीश बिल गेट्स यांची एन्ट्री होणार आहे.

'क्योंकि सास भी कभी बहू थी २'मध्ये बिल गेट्स यांची एन्ट्री, पाहा धमाकेदार प्रोमो
Bill Gates In Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi 2 : टीआरपीच्या शर्यतीत पुढे राहण्यासाठी मालिकांमध्ये निरनिराळे ट्विस्ट आणले जातात आणि अनेकदा लोकप्रिय व्यक्तींना पाहुणे म्हणून बोलावले जाते. पण आता टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच, जागतिक स्तरावरील एक अत्यंत मोठे व्यक्तिमत्त्व एका भारतीय मालिकेत दिसणार आहेत. प्रसिद्ध टीव्ही मालिका 'क्योंकि सास भी कभी बहू थी २' मध्ये मायक्रोसॉफ्टचे संस्थापक आणि जगप्रसिद्ध अब्जाधीश बिल गेट्स यांची एन्ट्री होणार आहे.
या मालिकेचा नवा प्रोमो नुकताच समोर आला आहे, ज्यामध्ये बिल गेट्स हे 'गेस्ट अपिअरन्स' म्हणून सहभागी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. समोर आलेल्या प्रोमोमध्ये, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांनी साकारलेली लोकप्रिय व्यक्तिरेखा तुलसी विराणी एका व्हिडीओ कॉलवर कोणाशी तरी बोलताना दिसत आहे. तुलसी त्यांच्या खास आणि अद्वितीय शैलीतील 'जय श्री कृष्णा' ने पाहुण्यांचे स्वागत करतात. समोरच्या व्यक्तीचा चेहरा दिसताच प्रेक्षकांना मोठा धक्का बसतो, कारण ती व्यक्ती दुसरी कोणी नसून खुद्द बिल गेट्स आहेत. बिल गेट्स यांनीही तुलसी यांच्या खास स्टाईलमध्ये प्रतिसाद देत "जय श्री कृष्णा तुलसीजी" असे म्हटले.
यानंतर तुलसी विराणी या बिल गेट्स यांच्याशी संवाद साधताना दिसतात. त्या म्हणतात, "अमेरिकेतून थेट आमच्या कुटुंबाशी संपर्क साधला, आम्हाला खूप छान वाटत आहे. आम्ही तुमची वाट पाहत होतो". यावर बिल गेट्स यांनी अतिशय साधेपणाने "धन्यवाद तुलसीजी" असे उत्तर दिले. मालिका आणि मनोरंजन क्षेत्रासाठी हा एक ऐतिहासिक क्षण मानला जात आहे. जागतिक स्तरावरील एक दिग्गज व्यक्ती थेट एका भारतीय टेलिव्हिजन मालिकेत पाहुणा म्हणून आल्याने 'क्योंकि सास भी कभी बहू थी २' च्या पुढील भागांसाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या भेटीमागचे नेमके कारण काय आहे आणि तुलसी-बिल गेट्स यांच्यात कोणती महत्त्वाची चर्चा होते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.