पोटासाठी हमाली केली,गोण्या उचलल्या! अमरावतीच्या 'बॉडी बिल्डर'ची बिग बॉसमध्ये एन्ट्री, नवऱ्याला टीव्हीवर पाहून पत्नीच्या अश्रूंचा बांध फुटला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 13:46 IST2026-01-13T13:38:25+5:302026-01-13T13:46:19+5:30
अमरावतीच्या 'बॉडी बिल्डर'ची बिग बॉसमध्ये एन्ट्री! नवऱ्याचं यश पाहून पत्नी झाली भावुक

पोटासाठी हमाली केली,गोण्या उचलल्या! अमरावतीच्या 'बॉडी बिल्डर'ची बिग बॉसमध्ये एन्ट्री, नवऱ्याला टीव्हीवर पाहून पत्नीच्या अश्रूंचा बांध फुटला
Bigg Boss Marathi 6: 'बिग बॉस मराठी'चं यंदाचं पर्व अगदी दणक्यात सुरु झालं आहे.या पर्वात एकूण १७ स्पर्धक सहभागी झाले आहेत. दरम्यान,' बिग बॉस मराठी ६' मध्ये अमरावतीचा देसी, बॉडी बिल्डर रोशन भजनकरची देखील एन्ट्री झाली आहे. हमाली काम सांभाळून त्यांनी आपली बॉडी बनवली आहे. आपल्या कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहासाठी एकेकाळी सिमेंटच्या गोणी उचलणाऱ्या अमरावतीच्या पठ्याची बिग बॉस पर्यंतची झेप अनेकांना प्रेरणा देणारी आहे. बिग बॉसच्या घरातील त्याची एन्ट्री होणं हे त्याच्यासाठी स्वप्नवत आहे.
विदर्भाचा हा पठ्ठ्या बिग बॉसमध्ये गेल्यानंतर रोशनच्या गावावाल्यांची छाती अभिमानाने फुलली आहे. रोशनच्या घरात त्याची पत्नी आणि दोन मुली असं त्याचं चौकोनी कुटुंब आहे.त्याच्या या प्रवासात पत्नी खंबीरपणे पाठीशी उभी राहिली आहे. अशातच रोशनच्या सोशल मिडिया अकाउंटवर एक व्हिडीओ समोर आला आहे. रोशनला बिग बॉसच्या घरात पाहण्यासाठी त्याच्या गावी प्रोजेक्टर लावण्यात आला होता. त्यावेळी आपल्या नवऱ्याला टीव्हीवर पाहून रोशनच्या पत्नीला अश्रू अनावर झाले.
रोशनची पत्नी त्याला 'बिग बॉस मराठी'च्या घरात पाहून भावुक झाल्याची पाहायला मिळतेय. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. तर नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.या व्हिडीओवर रोशनचे चाहते, सोशल मिडिया यूजर्स "रोशन दादा आता थांबायचं नाय, बिग बॉसची ट्रॉफी घरी घेऊनच यायचं... तसेच "त्यानं लोकांचं घर बनावं म्हणून hamal म्हणून काम केली, आज त्याच घर बनावं म्हणून आपण त्याला Support करू...", अशा लक्षवेधी कमेंट्स केल्या आहेत.
रोशन भजनकर हा मुळचा अमरावती मधील वरोडा गावातील आहे. हमाली काम सांभाळून त्यांनी आपली बॉडी बनवली आहे. गेल्या १४ ते १५ वर्षापासून रोशन हमाली काम करत आहेत. सुरवातीला बॉडी बिल्डर होणे हे काही त्यांचं स्वप्न नव्हतं. पण, हळूहळू त्यात आवड निर्माण झाली आणि आज संपूर्ण महाराष्ट्रात त्यांची चर्चा होत आहे.