Bigg Boss Marathi 5 : फिनालेमध्ये आला मोठा ट्विस्ट! ९ लाख घेऊन जान्हवी बाहेर, म्हणाली- "लोकांच्या मनात राग असेल, म्हणून..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2024 19:15 IST2024-10-06T19:14:34+5:302024-10-06T19:15:40+5:30
जान्हवी किल्लेकर हिने या स्पर्धेतून शेवटच्या क्षणी माघार घेतली आहे.

Bigg Boss Marathi 5 : फिनालेमध्ये आला मोठा ट्विस्ट! ९ लाख घेऊन जान्हवी बाहेर, म्हणाली- "लोकांच्या मनात राग असेल, म्हणून..."
'बिग बॉस मराठी'चा महाअंतिम सोहळा सुरू आहे. दोन आठवड्यांच्या ब्रेकनंतर रितेश देशमुख पुन्हा ग्रँड फिनालेमध्ये परतला आहे. काही वेळातच महाराष्ट्राला 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वाचा विजेता मिळणार आहे. पण, त्याआधी जान्हवी किल्लेकर हिने या स्पर्धेतून शेवटच्या क्षणी माघार घेतली आहे. पैशांनी भरलेली बॅग की ट्रॉफी असा प्रश्न समोर होता. यावेळी जान्हवीने पैशांची बॅग उचलून घर सोडलं आहे.
'बिग बॉस 15' ग्रँड फिनालेमध्ये रितेश एका एनवलपसह घरात पोहचला. या एनवलपमध्ये सर्वांत कमी मते पडलेल्या प्रेक्षकांचं नाव होतं. पण, त्या स्पर्धकाचं नाव उघड करण्याआधी रितेशने सूरज चव्हाण, अभिजीत सावंत, जान्हवी किल्लेकर, अंकिता वालावलकर, निक्की तांबोळी, धनंजय पोवार यांना ७ लाख रुपयांनी भरलेली पैशाची बॅग उचलून स्पर्धेतून माघार घेण्याची संधी दिली.
रितेशची ही ऑफर सर्व स्पर्धकांनी नाकारली. पण, त्यानंतर पुन्हा रितेशने रक्कमेत आणखी २ लाख वाढवले आणि ९ लाख ऑफर केले. यानंतर मात्र, जान्हवीने आपला निर्णय बदलला आणि ट्रॉफी सोडून पैशांची बॅग उचलली. यावेळी जान्हवी भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. ती म्हणाली, "मी 'बिग बॉस'च्या घरात मोठ्यांचा अपमान केला. त्यामुळे महाराष्ट्र नाराज झाला. त्यामुळे भीती वाटतेय. एक प्रायश्चित्त म्हणून मी पैशांची बॅग उचलत आहे"
विशेष म्हणजे जान्हवीचा हा निर्णय तिच्यासाठी योग्य ठरला. कारण, इन्व्हलपमध्ये तिचेच नाव होते. जर तिने पैशांची बॅग निवडली नसती. तर तिला रिकाम्या हाताने परतावे लागले असते. पण, आता तिला ९ लाख रुपये मिळाले आहेत. ही रक्कम जवळपास विजेत्याला मिळणाऱ्या रक्कमेच्या जवळपास आहे. विजेत्याला १४.६ लाख रुपये मिळणार आहेत.