केदार शिंदेंच्या वाढदिवशी सूरज चव्हाणच्या झापुक झुपूक शुभेच्छा, नेटकरी म्हणाले- "तुला भेटलेला देवमाणूस"
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 14:55 IST2025-01-16T14:54:50+5:302025-01-16T14:55:10+5:30
केदार शिंदे यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त 'बिग बॉस मराठी' फेम सूरज चव्हाणने खास पोस्ट शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत.

केदार शिंदेंच्या वाढदिवशी सूरज चव्हाणच्या झापुक झुपूक शुभेच्छा, नेटकरी म्हणाले- "तुला भेटलेला देवमाणूस"
केदार शिंदे हे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आणि दिग्दर्शक आहेत. 'अगं बाई अरेच्चा', 'जत्रा', 'बाईपण भारी देवा', 'अगं बाई अरेच्चा २' असे अनेक सुपरहिट सिनेमे त्यांनी सिनेसृष्टीला दिले आहेत. केदार शिंदे यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त 'बिग बॉस मराठी' फेम सूरज चव्हाणने खास पोस्ट शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत.
रीलस्टार आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असेलल्या सूरजने केदार शिंदेंबरोबरचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्याने झापुक झुपूक स्टाइलने केदार शिंदेंना शुभेच्छा दिल्या आहेत. "वाढदिवसाच्या झापुक झुपूक गोलीगत शुभेच्छा सर… श्री स्वामी समर्थ", असं कॅप्शन त्याने या फोटोला दिलं आहे. सूरजच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत केदार शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. "दगडाला देव बनवणारा कलाकार (देव माणूस)", "सूरजला भेटलेला देव माणूस", "माणसातील देव माणूस" अशा कमेंटही चाहत्यांनी केल्या आहेत.
सूरज चव्हाण बिग बॉस मराठी ५ मध्ये सहभागी झाला होता. या पर्वाचा तो विजेता होता. केदार शिंदे सूरज चव्हाणवर सिनेमा बनवत असून 'झापुक झुपूक' असं सिनेमाचं नाव आहे. हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.