'समोर आलास तर...' बॉडी शेमिंग करणाऱ्या युजरला मेघा धाडेचं सणसणीत उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2024 16:36 IST2024-02-23T16:36:20+5:302024-02-23T16:36:57+5:30
Megha dhade: मेघाने अलिकडेच सई लोकूर आणि शर्मिष्ठा राऊत या दोघींसोबतचा एक व्हिडीओ शेअर केला होता. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी मेघा आणि सईला वजनावरुन ट्रोल केलं आहे.

'समोर आलास तर...' बॉडी शेमिंग करणाऱ्या युजरला मेघा धाडेचं सणसणीत उत्तर
छोट्या पडद्यावर विशेष गाजलेला वादग्रस्त शो म्हणजे बिग बॉस. या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक कलाकार मंडळी पुन्हा एकदा प्रकाशझोतात आले आहेत. यातलंच एक नाव म्हणजे अभिनेत्री मेघा धाडे.बिग बॉस मराठीचं पहिलं पर्व जिंकत मेघाने तुफान लोकप्रियता मिळवली. मेघा सोशल मीडियावर सक्रीय असून कायम चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. मात्र, यावेळी ती एका ट्रोलिंगमुळे चर्चेत आली आहे. एका ट्रोलरला तिने सणसणीत उत्त देत त्याची बोलती बंद केली आहे.
अलिकडेच मेघाने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये तिच्यासोबत शर्मिष्ठा राऊत आणि सई लोकूर देखील दिसत होत्या. विशेष म्हणजे या व्हिडीओमध्ये या तिघीही मैत्रिणी त्यांची सुट्टी एन्जॉय करत असून मस्तपैकी झोक्यावर झोके घेत होत्या. हा व्हिडीओ पाहिल्यावर काही नेटकऱ्यांनी या अभिनेत्रींचं बॉडी शेमिंग केलं. इतकंच नाही तर काही जणांनी त्यांना वजनावरुनही ट्रोल केलं आहे. त्यामुळेच या ट्रोलर्सला मेघाने त्यांच्याच शब्दांत सुनावलं आहे.
मेघाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती, शर्मिष्ठा आणि सई झोका घेत होत्या. त्यांचा हा व्हिडीओ पाहून काही नेटकऱ्यांनी त्यांची खिल्ली उडवली. ‘झोका तुटेल…तीन हत्ती,’ अशी कमेंट करत एका युजरने त्यांना ट्रोल केलं. त्यावर संतापलेल्या मेघाने त्याच्याच भाषेत त्याला उत्तर दिलं. “झोक्याची काळजी करू नकोस स्वतःची कर. उगाच समोर आलास तर पायाखाली चिरडला जाशील म्हणून म्हटलं उंदरा” असं जबरदस्त उत्तर मेघाने या युजरला दिलं.
दरम्यान, या युजरप्रमाणेच अन्य काही युजरनेही त्यांची वजनावरुन खिल्ली उडवली आहे. मात्र, त्यांनाही मेधाने सडेतोड उत्तर दिलं आहे.