Bigg Boss Marathi 5 : 'बिग बॉस मराठी'चा धमाका! या दिवशी भेटीला; कल्ला करायला रितेश देशमुख सज्ज
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2024 18:59 IST2024-07-12T18:58:54+5:302024-07-12T18:59:10+5:30
Bigg Boss Marathi 5 : आता एक नवीन, सॉलिड, जबरी प्रोमो 'बिग बॉस' प्रेमींच्या भेटीला आलाय आणि 'बिग बॉस'च्या घराचं दार कधी उघडणार याची प्रतीक्षाही संपली आहे.

Bigg Boss Marathi 5 : 'बिग बॉस मराठी'चा धमाका! या दिवशी भेटीला; कल्ला करायला रितेश देशमुख सज्ज
तंटा नाय तर घंटा नाय... रितेश देशमुख(Riteish Deshmukh)चा हा डायलॉग आज महाराष्ट्रातील घराघरात तोंडपाठ झालाय. लोकप्रिय रिअॅलिटी शो 'बिग बॉस मराठी'(Bigg Boss Marathi 5)ची प्रेक्षक आतुरतेनं वाट पाहत आहेत. त्यात या सीझनचे चार प्रोमो समोर आले आणि त्यात रितेश देशमुखची 'लयभारी बॉसगिरी' पाहायला मिळाली. आता एक नवीन, सॉलिड, जबरी प्रोमो 'बिग बॉस'प्रेमींच्या भेटीला आलाय आणि 'बिग बॉस'च्या घराचं दार कधी उघडणार याची प्रतीक्षाही संपली आहे. तर बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन २८ जुलैपासून भेटीला येत आहे.
'बिग बॉस मराठी'च्या आतापर्यंत आलेल्या प्रोमोमध्ये रितेश देशमुख एका वेगळ्याच रांगड्या अंदाजात दिसतो आहे. या प्रोमोमध्ये एक आगळीवेगळी ऊर्जा अन् जोश पाहायला मिळतो आहे. प्रोमोनुसार, यंदा ढोल ताशाच्या गजरात सगळे स्पर्धक 'बिग बॉस'च्या घरात प्रवेश करणार आहेत. जे चांगले वागणार त्यांची रितेश भाऊ वाहवाह करणार... पण जे वाईट वागणार त्यांची तो कानउघडणी करणार आहे. रितेश म्हणतोय,"मी येणार तर कल्ला होणारच". आपल्या लाडक्या 'बिग बॉस' प्रेमींना नाराज न करता रितेश देशमुखने नव्या प्रोमोच्या माध्यमातून यंदाच्या सीझनची तारीखदेखील जाहीर केली आहे.
या दिवशी बिग बॉस मराठी भेटीला
मजा, मस्ती, ड्रामा अन् राडा असणारे बिग बॅास मराठीचे सुसज्ज आलिशान घर, १०० दिवस आणि अतरंगी स्पर्धकांचा सतरंगी प्रवास …. फक्त १५ दिवसांत सुरू होणार आहे. मराठी मनोरंजनाच्या 'बिग बॉस मराठी'चा ग्रँड प्रीमिअर रविवारी २८ जुलैला रात्री ९ वाजता 'कलर्स मराठी'वर होणार आहे आणि त्यानंतरचे भाग दररोज रात्री ९ वाजता प्रेक्षकांना पाहता येतील. शो कधी भेटीला येणार आहे हे कळलं असले तरी बिग बॉसच्या घरात कोण कोण जाणार, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे. घरातील मजा, मस्ती, डाव , प्रतिडाव आणि नव्या होस्टची कमाल अशा साऱ्याच गोष्टी पाहण्याची , अनुभवण्याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. 'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन २८ जुलैपासून दररोज रात्री ९ वाजता कलर्स मराठीवर आणि जिओ सिनेमावर पाहायला मिळेल.