Bigg boss मुळे झाली मीरा अन् तिच्या वडिलांची भेट; बाप-लेकीच्या नात्यातील दुरावा झाला दूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2021 15:15 IST2021-12-24T15:15:00+5:302021-12-24T15:15:00+5:30
Bigg boss marathi 3: या व्हिडीओमध्ये तिच्या वडिलांनी मीरासोबत धरलेला अबोला सोडला असून लवकरच तिला भेटून पुन्हा आपल्या घरी घेऊन जायचंय असं सांगितलं.

Bigg boss मुळे झाली मीरा अन् तिच्या वडिलांची भेट; बाप-लेकीच्या नात्यातील दुरावा झाला दूर
छोट्या पडद्यावरील अभिनेत्री मीरा जगन्नाथ (meera jagannath) हे नाव आता कोणत्याही मराठी प्रेक्षकासाठी नवीन राहिलेलं नाही. येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेत मोमो ही भूमिका साकारून लोकप्रिय झालेल्या मीरा जगन्नाथला बिग बॉस मराठीमुळे खरी ओळख मिळाली. शोमध्ये नुकत्याच पार पडलेल्या शेवटच्या एलिमिनेशन राऊंडमध्ये मीराला बिग बॉसच्या (bigg boss) घरातून बाहेर पडावं लागलं. परंतु, हा शो सोडल्यानंतर तिला तिची हरवलेली नाती पुन्हा मिळाली आहेत. गेल्या काही वर्षांपासून तिच्या वडिलांसोबतच असलेले मतभेद मिटले असून या बाप-लेकीतील दुरावा कायमचा दूर झाला आहे.
कलर्स मराठीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर मीराच्या आई-वडिलांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिच्या वडिलांनी मीरासोबत धरलेला अबोला सोडला असून लवकरच तिला भेटून पुन्हा आपल्या घरी घेऊन जायचंय असं सांगितलं. मीराच्या वडिलांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
गेल्या काही वर्षांपासून मीरा आणि तिच्या वडिलांमध्ये मतभेद होते. त्यामुळे तिच्या वडिलांनी मीरासोबत बोलणं बंद केलं होतं. इतकंच नाही तर मीरादेखील हट्टाने घर सोडून मुंबईत आली होती. मात्र, मुंबईत आल्यानंतर मीराने स्ट्रगल करुन मराठी कलाविश्वात स्थान निर्माण केलं. त्यामुळेच मुलीचा हा प्रवास, तिचा स्ट्रगल पाहून तिच्या आई-वडिलांच्या डोळ्यात पाणी आलं.
दरम्यान, बिग बॉसमध्ये मीरा सहभागी झाल्यानंतर अनेक जण मीराच्या वडिलांना तिच्या नावाने ओळखू लागले. हा क्षण त्यांच्यासाठी खूप खास होता. त्यामुळे बिग बॉसचं तिसरं पर्व संपल्यानंतर मीराची भेट घेणार असून तिला पुन्हा घरी घेऊन येणार असं तिच्या वडिलांनी सांगितलं.