'बिग बॉस' फेम प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आईचं निधन, अनेक दिवसांपासून सुरु होते उपचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2025 14:04 IST2025-10-02T14:01:53+5:302025-10-02T14:04:21+5:30
बिग बॉस अभिनेत्रीवर दुःखाचा डोंगर कोसळला असून तिच्या आईचं निधन झालं आहे

'बिग बॉस' फेम प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आईचं निधन, अनेक दिवसांपासून सुरु होते उपचार
प्रसिद्ध नृत्यांगना आणि अभिनेत्री सपना चौधरीवर (Sapna Choudhary) दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सपनाची आई नीलम चौधरी (Neelam Choudhary) यांचं दीर्घ आजाराने दिल्लीतील एका रुग्णालयात निधन झाले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, नीलम चौधरी अनेक दिवसांपासून कावीळ आणि यकृताशी संबंधित एका गंभीर आजाराने त्रस्त होत्या. परंतु मंगळवारी (३० सप्टेंबर) त्यांची प्राणज्योत मालवली.
सपनाच्या आईवर गेल्या अनेक दिवसांपासून उपचार सुरु होते. याशिवाय भविष्यात डॉक्टर त्यांच्यासाठी लिव्हर ट्रान्सप्लान्ट करण्याची योजना आखत होते. मात्र, संसर्ग वाढल्यामुळे मंगळवारी रात्री ११ वाजता उपचारादरम्यान त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बुधवारी नजफगड येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सपना चौधरी, त्यांचे पती वीर साहू आणि कुटुंबातील इतर सदस्य उपस्थित होते.
सपना चौधरी आपल्या आईच्या खूप जवळ होती. आईच्या निधनाने तिला मोठा धक्का बसला आहे. या दुःखाच्या प्रसंगी सपनाने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरील प्रोफाइल फोटो काढून त्याऐवजी काळा फोटो लावला आहे. मदर्स डेच्या दिवशीही सपनाने सोशल मीडियावर आई आणि सासूबाईंसोबतचे फोटो शेअर करून त्यांच्यावर प्रेम व्यक्त केलं होतं. आता आईच्या निधनामुळे सपना शोकसागरात बुडाली असून चाहते आणि सेलिब्रिटी तिला धीर देत आहेत.