'शार्क टँक' फेम अश्नीर ग्रोव्हरला 'बिग बॉस १९'कडून ईमेल, वाइल्ड कार्ड एन्ट्रीची ऑफर; म्हणाला- "आधी सलमान खानला..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 10:41 IST2025-09-27T10:40:50+5:302025-09-27T10:41:13+5:30
'बिग बॉस १९'च्या वाइल्ड कार्ड एन्ट्रीसाठी अश्नीर ग्रोव्हर यांना विचारणा झाल्याचा दावा त्यांनी केला आहे.

'शार्क टँक' फेम अश्नीर ग्रोव्हरला 'बिग बॉस १९'कडून ईमेल, वाइल्ड कार्ड एन्ट्रीची ऑफर; म्हणाला- "आधी सलमान खानला..."
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९' सुरू होऊन चार आठवडे झाले आहेत. यंदाच्या सीझनमध्ये बिग बॉस प्रेक्षकांना आश्चर्याचे धक्के देत आहे. गेल्या आठवड्यात नेहालला बिग बॉसने सीक्रेट रुममध्ये ठेवलं होतं. त्यानंतर आता 'बिग बॉस १९'मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्रीची चर्चा रंगली आहे. यंदाच्या सीझनमध्ये वाइल्ड कार्ड म्हणून कोण एन्ट्री घेणार यासाठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. अनेक नावंही समोर आली आहेत. आता 'बिग बॉस १९'च्या वाइल्ड कार्ड एन्ट्रीसाठी अश्नीर ग्रोव्हर यांना विचारणा झाल्याचा दावा त्यांनी केला आहे.
शार्क टँक फेम अश्नीर ग्रोव्हर यांना 'बिग बॉस १९'मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्रीसाठी ऑफर मिळाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 'बिग बॉस १९'कडून अश्नीर ग्रोव्हर यांना एक ईमेल आला आहे. याचा स्क्रिनशॉट अश्नीर ग्रोव्हर यांनी शेअर केला आहे. "बिग बॉस १९ वाइल्ड कार्ड एन्ट्रीसाठी कास्टिंग निमंत्रण", असं इमेलमध्ये म्हटलं गेलं आहे. 'बिग बॉस १९'च्या कास्टिंग टीमकडून हा इमेल अश्नीर ग्रोव्हर यांना पाठवण्यात आल्याचं दिसत आहे. "तुमचं आकर्षक व्यक्तिमत्त्व आणि सोशल मीडियावर असलेली प्रसिद्धी यामुळे आमच्या टीमचं लक्ष वेधलं गेलं आहे", असंही ईमेलमध्ये म्हटलं आहे.
अश्नीर ग्रोव्हर यांनी या ईमेलचा स्क्रीनशॉट शेअर करत मजेशीर रिप्लाय दिला आहे. "आधी सलमान खानला विचारा. मी तर तोपर्यंत फ्री होईन... हे मेल मर्ज कोणाची तरी नोकरी खाणार आहे", असं त्यांनी म्हटलं आहे. बिग बॉस १८च्या सीझनमध्ये अश्नीर ग्रोव्हर आणि सलमान खान यांच्यामध्ये वाद झाला होता. अश्नीर ग्रोव्हर यांनी सलमानबद्दल केलेलं वक्तव्य त्याला न पटल्याने भाईजानने बिग बॉसमध्ये त्यांना बोलवत नॅशनल टीव्हीवर त्यांना सुनावलं होतं. सलमानचं वागणं न पटल्याने अश्नीर ग्रोव्हर यांनीही नंतर त्याला ट्रोल केलं होतं. सध्या अश्नीर ग्रोव्हर हे राइज अँड फॉल या रिएलिटी शोचं सूत्रसंचालन करत आहेत.