Bigg Boss 19: सलमान खानने आईचा उल्लेख करत फरहाना भटला दाखवला बाहेरचा रस्ता, अभिनेत्रीला अश्रू अनावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 13:12 IST2025-11-08T13:09:05+5:302025-11-08T13:12:01+5:30
बिग बॉस १९ चा नवीन प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोत सलमानने फरहानाला चांगलंच सुनावलं आहे. काय घडलंय?

Bigg Boss 19: सलमान खानने आईचा उल्लेख करत फरहाना भटला दाखवला बाहेरचा रस्ता, अभिनेत्रीला अश्रू अनावर
लोकप्रिय रिॲलिटी शो 'बिग बॉस १९' चा (Bigg Boss 19) 'वीकेंड का वार' हा भाग नेहमीच स्पर्धकांसाठी खास असतो. यावेळी शोचा होस्ट सलमान खानने अभिनेत्री आणि स्पर्धक फरहाना भट (Farhana Bhatt) हिला अत्यंत खालची भाषा वापरल्याबद्दल चांगलंच फटकारलं. फरहानाने सह-स्पर्धकांना 'गंदी नाले के कीडे' असं संबोधल्यामुळे सलमान अत्यंत संतापला होता. याशिवाय तिला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.
अपमानास्पद भाषेमुळे सलमान संतापला
या आठवड्यात फरहाना भटने वापरलेली भाषा सभ्यतेच्या सर्व मर्यादा ओलांडणारी होती. आठवड्यात एका टास्कदरम्यान फरहानाने तिचा सह स्पर्धक शहबाज आणि मृदुल यांना उद्देशून 'गंदी नाले के कीडे' असे अपमानास्पद शब्द वापरले. 'वीकेंड का वार'मध्ये सलमान खानने हा मुद्दा थेट उपस्थित केला. त्याने फरहानाला स्पष्ट शब्दांत सुनावलं की, या घरात खेळताना काही मर्यादा पाळणे आवश्यक आहे आणि तिने वापरलेले शब्द हे अत्यंत घाणेरडे आहेत.
सलमान खानने फरहानाला तिच्या या भाषेबद्दल सडेतोड सवाल केला. तो म्हणाला, "तू काय म्हणालीस? बी ग्रेड लोक. गंदी नाली का किडा. तुम्ही नॅशनल टेलिव्हिजनवर हे सर्व बोलत आहात. टीव्हीचा दर्जा तुझ्यापेक्षा कमी आहे. टीव्हीची लायकी नाही की तू यावर दिसशील. मला लाज वाटली हे सर्व ऐकताना. मी आणि माझ्या आईने गौरवचे शो पाहिलेत. तो सुपरस्टार आहे. मी तुला एक ऑफर देतो. हा शो, हे माध्यम तुझ्यासाठी फार छोटं आहे.''' असं म्हणत सलमान गेट उघडायला सांगतो आणि फरहानाला बाहेरचा रस्ता दाखवतो. आता फरहाना खरंच बाहेर गेलीय का, हे आजच्या भागात कळेल.
सलमानच्या या कठोर शब्दांमुळे फरहानासह घरातील इतर स्पर्धकांनाही स्वतःची भाषा जपून वापरण्याची शिकवण मिळाली आहे. सलमानने स्पष्ट केले की, प्रेक्षकांनाही अशी भाषा ऐकणं आवडत नाही आणि यामुळे शोची पातळी खालावते. या घटनेमुळे फरहानाच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे, तर शहबाज आणि मृदुल यांना सलमानचा जाहीर पाठिंबा मिळाल्याने त्यांना दिलासा मिळाला.