सलमान खान स्वत: 'बिग बॉस'चे सगळे एपिसोड्स बघतो का? अखेर निर्मात्यांनी केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 17:58 IST2025-10-29T17:57:02+5:302025-10-29T17:58:17+5:30
सलमान खान खरंच २०० कोटींचं मानधन घेतो? निर्माते म्हणाले...

सलमान खान स्वत: 'बिग बॉस'चे सगळे एपिसोड्स बघतो का? अखेर निर्मात्यांनी केला खुलासा
सलमान खान गेल्या अनेक वर्षांपासून 'बिग बॉस' हा रिएलिटी शो होस्ट करत आहे. 'वीकेंड का वार'मध्ये तो घरातील सदस्यांना चांगलंच धारेवर धरतो. तसंच सलमानचा होस्ट करतानाचा सेन्स ऑफ ह्युमरही प्रेक्षकांना खूप आवडतो. दरम्यान सलमान प्रत्येक एपिसोडसाठी कोट्यवधी रुपयांचं मानधन घेतो अशीही अनेकदा चर्चा झाली. तसंच सलमान खरंच बिग बॉस पाहतो का? यावरही आता खुलासा झाला आहे. शोच्या निर्मात्यांनीच यावर उत्तर दिलं आहे.
'बिग बॉस'चे निर्माते ऋषी नेगी इंडिया टुडेशी बोलताना म्हणाले, "सलमान बरेचसे एपिसोड्स स्वत: पाहतो. जर कधी त्याला सगळे एपिसोड पाहता आले नाही तर तो वीकेंडला आमच्यासोबत बसून एक दोन तास फुटेज पाहतो. यात घरातील सर्व मोठे मुद्दे दाखवले जातात. यामुळे त्याला घरातील प्रत्येक सदस्याबद्दल आणि संबंधीत घटनेबद्दल संपूर्ण माहिती मिळते. तसंच त्याचे बरेचसे निकटवर्तीय शो बघतात आणि त्याला फीडबॅक देतात. त्याला एकंदर परिस्थितीचा अंदाज असतो. तसंच मेकर्सचेही त्यांचे विचार असतात. प्रेक्षकांच्या प्रतिक्रियाही सतत येत असतात. हे सगळं मिळूनच वीकेंड का वार तयार केला जातो."
सलमानवर अनेकदा पक्षपातीपणाचाही आरोप होतो. तसंच सलमान जे बोलते ते त्याला कानात मागून सांगितलं जातं. या चर्चांवर ते म्हणाले, "सलमानला जे कोणी ओळखतात, त्यांना माहित आहे की कोणीही त्याच्याकडून काहीही वदवून घेऊ शकत नाही. सलमानचाच विश्वास नसेल तर त्याला कोणीही तसं बोलायला सांगू शकत नाही. आता आम्ही त्याला फक्त ब्रीफ करत नाही तर तो स्वत:च फुटेज पाहतो जेणेकरुन त्याला संदर्भ कळेल. मग कोण बरोबर आहे आणि कोण चुकीचं हे तो स्वत:च ठरवतो. आम्ही चर्चा करतो आणि मग शूट सुरु करतो."
सलमान 'बिग बॉस'साठी २०० कोटी मानधन घेतो?
सलमान खानच्या मानधनाबद्दल विचारलं असता ते म्हणाले, "तो कॉन्ट्रॅक्ट सलमान आणि जियोमध्ये झाला आहे. मी त्यात सामील नाही. पण जे काही मानधन त्याला मिळतं त्या प्रत्येक पैशावर त्याचा अधिकार आहे. तो प्रत्येक वीकेंड आमच्यासोबत आहे हेच माझ्यासाठी खूप आहे."
'बिग बॉस'होस्ट करुन सलमान कंटाळला का?
ऋषी नेगी म्हणाले, "हो, काही सीझन झाल्यानंतर सलमान आम्हाला म्हणतो की हा माझा शेवटचा सीझन होता. पण आता तोही या शोसोबत भावनिकरित्या जोडला गेला आहे. जेव्हा तुम्ही त्याला स्टेजवर पाहता तेव्हा त्याची मेहनत स्पष्ट दिसते. काही वाद असतील किंवा एखादा मुद्दा असेल, तो अगदी मनापासून करतो. अनेकदा त्याने आता होस्ट करणार नाही असं म्हटलं आहे. पण आजपर्यंत शेवटी होकारच दिला आहे. प्रत्येक सीझनच्या आधी आमची मीटिंग होते, शोच्या फॉर्मॅटवर चर्चा होते आणि मग त्याला पूर्ण ब्रीफिंग केलं जातं."