Bigg Boss 19: 'बिग बॉस'च्या घरात मालतीचा भाऊ दीपक चहरची एन्ट्री, क्रिकेटरला पाहून सदस्यांना बसला धक्का
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 12:31 IST2025-11-21T12:30:40+5:302025-11-21T12:31:13+5:30
मालती चहरचा भाऊ आणि भारतीय क्रिकेटर असलेला दीपक चहर बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेणार आहे. याचा प्रोमो व्हिडीओ समोर आला आहे.

Bigg Boss 19: 'बिग बॉस'च्या घरात मालतीचा भाऊ दीपक चहरची एन्ट्री, क्रिकेटरला पाहून सदस्यांना बसला धक्का
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९' हे पर्व अंतिम टप्प्यात आलं असून या पर्वाचे आता शेवटचे काही आठवडे शिल्लक राहिले आहेत. बिग बॉसच्या घरात हा आठवडा फॅमिली वीक म्हणून सेलिब्रेट केला गेला. या आठवड्यात घरातील सदस्यांच्या कुटुंबीयांनी बिग बॉसच्या घरात हजेरी लावत सरप्राइज दिलं. गौरव खन्ना, प्रणित मोरे, तान्या मित्तल, फरहाना भट, कुनिका सदानंद, शहबाज, अश्नूर कौर आणि अमाल मलिक यांच्यानंतर मालती चहरचे कुटुंबीय आता बिग बॉसमध्ये येणार आहेत.
मालती चहरचा भाऊ आणि भारतीय क्रिकेटर असलेला दीपक चहर बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेणार आहे. याचा प्रोमो व्हिडीओ समोर आला आहे. सगळ्या सदस्यांचे कुटुंबीय आले पण मालतीच्या घरातील कोणीच आल्याने ती नाराज होती. गार्डनमधील सोफ्यावर मालती झोपलेली असतानाच दीपक चहरने तिला सरप्राइज दिलं. भाऊ दीपकला पाहून मालतीच्या चेहऱ्यावरही हसू खुललं. त्यानंतर दीपक चहरने घरातील सगळ्यांची भेट घेतली.
बिग बॉसच्या घरातील व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये दीपक मालतीबद्दल घरातील इतर सदस्यांशी लिव्हिंग रुममध्ये बोलताना दिसत आहे. तो म्हणतो, "मी या घरात फक्त एकाच कारणासाठी आलेलो आहे. माझ्या बहिणीने आजपर्यंत एकदाही रोटी बनवलेली नाही. आज हीच जेवण बनवणार आणि मी जेवून जाणार". त्यानंतर घराचा कॅप्टन असलेला शहबाज दीपकला म्हणतो, "अजून कोणती ड्युटी करून घ्यायची असेल तर सांगा". व्हिडीओत दिसतंय की कुनिका दीपकसाठी पाण्याचा ग्लास घेऊन येते. तेव्हा तो मालतीकडे बघून मजेत म्हणतो, "बघितलं मी हिच्याकडे पाणी मागितलं होतं हिने ते पण नाही दिलं". मग गौरव म्हणतो की "असं वाटतंय की मालती विचार करत असेल घरातून हा का आलाय?".
इतक्या दिवसांनंतर बिग बॉसच्या घरातील खेळ आता बदलला आहे. शो अंतिम टप्प्यात आल्याने आता घरातील समीकरणंही बदलत आहेत. गौरव खन्ना, प्रणित मोरे, तान्या मित्तल, फरहाना भट, कुनिका सदानंद, शहबाज, अश्नूर कौर, मालती चहर आणि अमाल मलिक यापैकी बिग बॉसच्या ट्रॉफीवर कोण नाव कोरणार, हे पाहावं लागेल. या आठवड्यात घरातील एका सदस्याचा प्रवास संपणार आहे.