'बिग बॉस १९'मधून बाहेर पडल्यावर प्रणित मोरेसाठी अंकिता वालावलकरची पोस्ट, म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 11:07 IST2025-12-08T11:07:11+5:302025-12-08T11:07:46+5:30
प्रणितसाठी "कोकण हार्टेड गर्ल" अंकिता वालावलकरनं खास पोस्ट शेअर केली आहे.

'बिग बॉस १९'मधून बाहेर पडल्यावर प्रणित मोरेसाठी अंकिता वालावलकरची पोस्ट, म्हणाली...
नुकताच 'बिग बॉस' हिंदीच्या सीझन १९ चा महाअंतिम सोहळा पार पडला. सलमान खानच्या या शोने प्रेक्षकांची उत्सुकता शेवटपर्यंत ताणून धरली होती. पण अखेर या शोचे विजेतेपद गौरव खन्नाच्या नावे झाले. गौरव खन्नाने 'बिग बॉस १९'ची चमकदार ट्रॉफी जिंकली. तर उपविजेती ठरली फरहाना भट्ट. 'बिग बॉस १९'च्या 'टॉप-३'मध्ये पोहचून मराठमोळा प्रणित मोरे तिसऱ्या नंबरवर एलिमिनेट झाला. 'बिग बॉस १९'च्या अंतिम फेरीतील मतदानाच्या ट्रेंडमध्ये प्रणीत मोरेने मोठी आघाडी घेतली होती. त्यामुळे प्रणित मोरे यंदाची ट्रॉफी जिंकेल, असं अनेकांना वाटलं होतं. मात्र, विजेतेपदावर गौरव खन्नाने नाव कोरल्यामुळे चाहत्यांचा मोठा अपेक्षाभंग झाला. पण, 'टॉप-३' पर्यंत मजल मारलेल्या प्रणितच्या खेळाचे चाहते कौतुक करताना दिसून येत आहेत.
प्रणितसाठी "कोकण हार्टेड गर्ल" अंकिता वालावलकरनं खास पोस्ट शेअर केली आहे. ज्यात तिनं प्रणितच्या खेळाचं कौतुक केलंय. तसेच 'प्रणित तूच खरा विजेता' अशी प्रतिक्रिया दिली आहे. अंकिताने इन्स्टाग्राम स्टोरीवर प्रणितचा फोटो शेअर करत म्हटलं आहे की, "छान खेळलास... शिवीगाळ नाही, कुठला अनावश्यक ड्रामा नाही... संपूर्ण प्रवासात तू खूप प्रतिष्ठेनं खेळलास. मतं तर फक्त एक कारणं आहे... आमच्यासाठी तर तू आधीपासूनच विजेता आहेस".

दरम्यान, यंदा जेव्हा प्रणितनं बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतली होती. तेव्हापासून अंकिता त्याला पाठिंबा देताना दिसून आली आहे. यंदा 'बिग बॉस' हिंदीच्या घरात प्रणित मोरे हा एकमेव मराठी स्पर्धक सहभागी झाला आहे. स्टँडअप कॉमेडियन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रणित मोरेने अल्पावधीतच सर्वांची मनं जिंकून घेतली. सोशल मीडियावर सर्वत्र त्याची क्रेझ निर्माण झाली. त्याला चाहते 'महाराष्ट्रीयन भाऊ' म्हणून देखील ओळखतात. 'बिग बॉस' हिंदीनंतर प्रणितच्या स्टँडअप शोसाठी चाहेत उत्सुक आहेत.