"फरहानाने मला शिव्या दिल्या, तरी सलमान काहीच बोलला नाही...", बसीर अलीचे 'बिग बॉस'वर गंभीर आरोप
By कोमल खांबे | Updated: November 7, 2025 11:55 IST2025-11-07T11:24:01+5:302025-11-07T11:55:43+5:30
'बिग बॉस'च्या घरातून बाहेर पडल्यानंतर बसीरने सलमान खान आणि 'बिग बॉस'वर आरोप केले आहेत.

"फरहानाने मला शिव्या दिल्या, तरी सलमान काहीच बोलला नाही...", बसीर अलीचे 'बिग बॉस'वर गंभीर आरोप
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९' अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. बिग बॉसच्या घरातून बसीर अली आणि नेहाल चुडासमाचं एलिमिनेशन झाल्यानंतर सगळ्यांनाच मोठा धक्का बसला होता. बसीर आणि नेहाल दोघेही 'बिग बॉस'च्या घरातील चर्चेतील आणि स्ट्राँग स्पर्धक होते. त्यामुळे ते इतक्या लवकर बाहेर पडतील असं कोणालाच वाटलं नव्हतं. 'बिग बॉस'च्या घरातून बाहेर पडल्यानंतर बसीरने सलमान खान आणि 'बिग बॉस'वर आरोप केले आहेत.
बसीरने पिंकविलाला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने बिग बॉस काही लोकांवरच फोकस करत पक्षपात असल्याचं म्हटलं आहे. बसीर म्हणाला, "असे अनेक मुद्दे होते जे आमच्यासमोर घडले. आम्हाला वाटलेलं की वीकेंड का वारमध्ये ते सलमान सरांकडून बोलले जातील. पण, तसं काहीच घडलं नाही. एका आठवड्यात नॉमिनेशन टास्कमध्ये मी आणि अभिषेक सोडून सगळे नॉमिनेट झाले होते. अश्नूरने अभिषेकचं नाव घेतलं नाही त्यामुळे तो नॉमिनेट झाला नाही. मला आणि अभिषेकला झिरो व्होट होते. त्यामुळे आम्ही नॉमिनेट झालो नव्हतो. तेव्हा वीकेंड का वारमध्ये सलमान सरांनी अश्नूरचं अभिषेकला व्होट न केल्याबद्दल कौतुक केलं. पण, माझं नाव कुठेच आलं नाही. किंवा मला विचारलंही नाही".
"जेव्हा फरहानासोबत माझं भांडण झालं होते. तेव्हा तिने खूप वाईट शब्द वापरले होते. फरहानासाठी घरात एक पुस्तक आलं होतं ज्यामध्ये तिने दिलेल्या शिव्या वगैरे होत्या. पण, माझ्यासोबत झालेलं भांडण आणि तिने दिलेल्या शिव्या याचा काहीच उल्लेख नव्हता. मी याबाबत सलमान सरांना विचारलं की तिने मला अशा शिव्याही दिल्या. तेव्हा ते म्हणाले की तू खूप चांगल्या प्रकारे ती परिस्थिती सांभाळलीस. त्यामुळे त्याबद्दल बोलणं गरजेचं नाही. मला असं वाटतं की शोमध्ये माझ्याकडे दुर्लक्ष केलं गेलं. मी घरात फिरायचो तेव्हा एकही कॅमेरा माझ्यावर नसायचा. वॉशरुममध्ये माझ्यावर कॅमेरा फोकस होत नव्हता. बिग बॉसच्या घरातील कॅमेरे अॅक्टिव्ह नव्हते. मला असं वाटतं की मेकर्सला मला दाखवण्यात इंटरेस्ट नव्हता", असं म्हणत बसीरने नाराजी व्यक्त केली आहे.