"तू हिंदू आहेस की मुस्लिम?", 'बिग बॉस १८' फेम अभिनेत्रीला मुंबईत मिळत नाहीये घर, विचारले जात आहेत अजब प्रश्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 09:32 IST2025-01-22T09:26:15+5:302025-01-22T09:32:04+5:30
अभिनेत्री मुंबईत राहण्यासाठी भाड्याचं घर शोधत आहे. मात्र घर शोधताना तिला तिचा धर्म विचारला जात असल्याचं अभिनेत्रीने म्हटलं आहे. त्याबरोबरच अभिनेत्री असल्यामुळे घर देण्यात लोक तयार नसल्याचं यामिनीने म्हटलं आहे.

"तू हिंदू आहेस की मुस्लिम?", 'बिग बॉस १८' फेम अभिनेत्रीला मुंबईत मिळत नाहीये घर, विचारले जात आहेत अजब प्रश्न
अभिनेत्री यामिनी मल्होत्रा 'बिग बॉस १८'मुळे चर्चेत आली होती. 'बिग बॉस'मध्ये तिने वाइल्ड कार्ड एन्ट्री घेतली होती. पण, आता 'बिग बॉस' नंतर मात्र तिला मुंबईत घर मिळत नाहीये. यामिनी मुंबईत राहण्यासाठी भाड्याचं घर शोधत आहे. मात्र घर शोधताना तिला तिचा धर्म विचारला जात असल्याचं अभिनेत्रीने म्हटलं आहे. त्याबरोबरच अभिनेत्री असल्यामुळे घर देण्यात लोक तयार नसल्याचं यामिनीने म्हटलं आहे.
यामिनीने तिच्या इन्स्टाग्रामवरुन एक खास पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिने मुंबईत घर मिळत नसल्याचं म्हटलं आहे. "मला तुमच्यासोबत एक खूपच निराशाजनक गोष्ट शेअर करायची आहे. मला मुंबई खूप आवडते. पण, इथे घर मिळवणं मात्र खूपच कठीण झालं आहे. तू हिंदू आहेस की मुस्लिम? गुजराती आहेस की मारवाडी? असे प्रश्न मला विचारले जात आहेत. आणि जेव्हा लोकांना कळतं की मी अभिनेत्री आहे. तेव्हा ते नकार देतात. अभिनेत्री असल्यामुळे मी घर मिळवण्यासाठी पात्र होत नाही का? २०२५ मध्येही असे प्रश्न विचारले जाणे हे धक्कादायक आहे. जर स्वप्नांसाठी अशा अटी असतील तर मुंबईला स्वप्नांचं शहर म्हणावं का?", असं यामिनीने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, याआधीही काही अभिनेत्रींना मुंबईत घर मिळवण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागला आहे. अभिनेत्री चारू असोपाला देखील घटस्फोटानंतर घर मिळत नव्हतं. सिंगल मदर असल्याने घर मिळवण्यासाठी अडचणी आल्याचं तिने म्हटलं होतं.