नशेत असलेल्या जॅग्वारमधील माणसाने अभिनेत्रीचा केला पाठलाग; म्हणाली, "२० मिनिटं तो..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 11:52 IST2025-02-18T11:51:29+5:302025-02-18T11:52:27+5:30
मी पूर्ण कपडे घातले होते त्यामुळे कपड्यावरुन पोलिसांना मला दोष देता येणार नाही, अभिनेत्री स्पष्टच बोलली

नशेत असलेल्या जॅग्वारमधील माणसाने अभिनेत्रीचा केला पाठलाग; म्हणाली, "२० मिनिटं तो..."
बिग बॉस १८ फेम अभिनेत्री एडिन रोजला (Edin Rose) काल रात्री मुंबईत वाईट अनुभव आला. सोमवारी रात्री एडिन तिच्या मैत्रिणीसोबत जुहू वरुन बांद्राला येत होती. दोघीही रिक्षाने प्रवास करत होत्या. तेव्हा जॅग्वारमधील एका तरुणाने नशेत त्यांच्या रिक्षेचा पाठलाग केला. २० मिनिटे तो त्यांच्या मागे होता असं एडिनने तिच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले आहे. शेवटी तिने जुहू पोलिस स्टेशनसमोर रिक्षा थांबवल्याचाही खुलासा केला. नक्की काय घडलं वाचा.
एडिन रोजने इन्स्टाग्राम स्टोरीवर लांबलचक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने तिचा मास्क लावलेला फोटोही पोस्ट केला आहे. ती लिहिते, "मी २०२० पासून मुंबईत राहत आहे. मला अशा प्रकारे कधीच असुरक्षित वाटलं नाही. रात्री कोणत्याही वेळी या शहरात फिरता येतं. काल मी असंच चांगलं वाटावं म्हणून बाहेर पडले. मी फुल ट्रॅक पँट घातली होती आणि चेहऱ्याला मास्कही लावला होता. त्यामुळे कोणीही माझ्या कपड्यांवरुन मला बोलू शकत नाही. पोलिसही माझ्या कपड्यांना दोष देऊ शकत नाहीत. मी आणि माझी मैत्रीण रिक्षातून जुहूवरुन बांद्राला निघालो होतो. दिवसभर काम केल्यावर जरा बरं वाटावं म्हणून आम्ही बाहेर पडलो. इतर वेळी काही लोक मला ओळखतात पण यावेळी मी मास्कही लावला होता. जॅग्वारमध्ये असलेला एक माणूस नशेत आमचा २० मिनिटं पाठलाग करत होता. आम्ही जिथे जाऊ, जे वळणं घेऊ तो तिथे येत होता."
ती पुढे म्हणाली,"या माणसाच्या रॅश ड्रायव्हिंगमुळे रस्त्यावरील लोक असुरक्षित होतेच शिवाय तो मागे हटणार नाही अशाच आविर्भावात आमचा पाठलाग करत होता. आम्ही अगदी त्याचं रेकॉर्डिंगही केलं, त्याची नंबर प्लेट नोट केली आता काय दुबईपर्यंत माझा पाठलाग करणार का असं मला वाटलं? रिक्षाचालकाने मध्येच रिक्षा थांबवली तर या माणसानेही त्याची कार रस्त्याच्या मधोमधच थांबवली. मग युटर्न घेऊन जोरात येत होता. शेवटी मी जुहू पोलिस स्टेशनबाहेर रिक्षा नेली. सगळे लेटंट लेटंट करत आहेत, पण महिलांच्या सुरेक्षवरही लक्ष द्या. हा माणूस जॅग्वारमध्ये होता म्हणजेच पैसेवाला असणार आणि आम्ही रेकॉर्ड करतोय हे माहित असून तो तसाच वागत होता."