Bigg Boss 13 Finale : आज रंगणार फिनाले, या सहा कंटेस्टंटपैकी बनणार एक विजेता
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2020 15:18 IST2020-02-15T15:17:40+5:302020-02-15T15:18:34+5:30
Bigg Boss 13 Finalists : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय वादग्रस्त रिएलिटी शो बिग बॉस १३चा ग्रॅण्ड फिनाले आज पार पडणार आहे.

Bigg Boss 13 Finale : आज रंगणार फिनाले, या सहा कंटेस्टंटपैकी बनणार एक विजेता
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय वादग्रस्त रिएलिटी शो बिग बॉस १३चा ग्रॅण्ड फिनाले आज पार पडणार आहे. याचे प्रसारण रात्री नऊ वाजल्यापासून सुरू होणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विजेत्याचे नाव रात्री १२ वाजता जाहीर केले जाईल. अशीदेखील माहिती मिळतेय की यावेळी लाइव्ह व्होटिंग केले जाणार आहे. त्यामुळे प्रेक्षक आपल्या आवडत्या स्पर्धकाला लाइव्ह व्होट करू शकतात. जवळपास साडे चार महिन्यांपासून सुरू असलेला हा शो आतापर्यंतचा यशस्वी सीझन आहे. याआधीच्या सीझनचा कालावधी तीन महिने होता. मात्र या शोची लोकप्रियता पाहून निर्मात्यांनी हा शो आणखीन दीड महिना वाढवला होता.
बिग बॉस १३मध्ये यावेळी सहा फायनलिस्ट आहेत. यात सिद्धार्थ शुक्ला, शहनाज गिल, आरती सिंग, रश्मी देसाई, पारस छाब्रा व आसिम रियाज यांचा समावेश आहे. सहा अंतिम स्पर्धक असण्याचीदेखील ही पहिलीच वेळ आहे. आतापर्यंत फक्त पाच लोकच फिनालेमध्ये पोहचतात.
शोमधील प्रबळ स्पर्धकांबद्दल बोलायचं तर सिद्धार्थ शुक्ला व आसिम रियाज यांच्यामध्ये सर्वात जास्त चढाओढ असल्याचं बोलले जात आहे. सोशल मीडियावर नजर टाकली तर चार महिन्यात सिद्धार्थ व आसिमच्या सपोर्टमध्ये जास्त ट्रेंड पहायला मिळतो. या सहा स्पर्धकांपैकी एक जण आज बिग बॉसची ट्रॉफी जिंकणार आहे.
बिग बॉस १३ चा ग्रॅण्ड फिनाले आणखीन ग्रॅण्ड बनवण्यासाठी शोच्या निर्मात्यांनी कोणतीच कसर ठेवली नाही. फिनालेला चारचाँद लावण्यासाठी सिद्धार्थ शुक्ला व रश्मी देसाई परफॉर्मन्स करताना दिसणार आहेत. ते दोघे अंग लगा दे रे या गाण्यावर थिरकताना दिसणार आहे.
सिद्धार्थ रश्मीशिवाय अंतिम सोहळ्यात आसिम व हिमांशी खुराना देखील रोमँटिक गाण्यावर डान्स करताना दिसणार आहे.