निलेश साबळेनेच मला बाईचं कॅरेक्टर करायला सांगितलं होतं, भाऊ कदमचा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2025 15:59 IST2025-09-20T15:58:44+5:302025-09-20T15:59:18+5:30
भाऊ कदमची काय होती पहिली रिअॅक्शन

निलेश साबळेनेच मला बाईचं कॅरेक्टर करायला सांगितलं होतं, भाऊ कदमचा खुलासा
'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाने १० वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन केलं होतं. डॉ निलेश साबळेने कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि इतर जबाबदारी सांभाळली होती. भाऊ कदम, सागर कारंडे, श्रेया बुगडे, भारत गणेशपुरे, कुशल बद्रिके हे सगळे स्टार झाले होते. भाऊ कदम आणि सागर कारंडे यांनी कार्यक्रमात काही एपिसोड्समध्ये स्त्री भूमिकेतही स्किट केले होते. काही वर्षांनी मात्र लोक याला कंटाळले आणि शोचा टीआरपीही घसरला. १० वर्षांनी शो बंद पडला. नुकतंच भाऊ कदमने स्त्री पात्र साकारण्याची सुरुवात नक्की कशी सुरु झाली होती याचा किस्सा सांगितला.
मुक्कामपोस्ट मनोरंजनला दिलेल्या मुलाखतीत भाऊ कदम म्हणाला, "सुरुवातीला मला निलेश साबळेने सांगितलं की, 'तू बाई व्हायचंय'. मी म्हणालो, 'काय? अरे मी कसा दिसेन. मी कसा दिसतो मला माहितीये आणि तू हे काय करायला लावतोय?' मग तो म्हणाला, 'तीच गंमत आहे रे भाऊ. आपण मेकअप करु छान.' निलेशला माझ्यात ते टॅलेंट दिसतंय ना म्हणून मी ते केलं आणि ते शांताबाईचं कॅरेक्टर लोकांना खूप आवडलं. विक्षिप्त न दिसता सगळं सांभाळून आम्ही ते केलं.
तो पुढे म्हणाला, "मी कुठेही इव्हेंटला गेलो की मला बायका तर शांताबाई म्हणूनच बोलायच्या. तसंच आम्ही त्या कॅरेक्टरमध्ये काही ओव्हर असं दाखवलं नाही त्यामुळे ते छान वाटलं. पहिल्यांदा करणार होतो तेव्हा मी बायकोला फोटो पाठवला होता. तिने परवानगी दिली त्यामुळे निर्धास्त झालो."
भाऊ कदम नुकताच 'इन्स्पेक्टर झेंडे' सिनेमात दिसला. यामध्ये त्याने मनोज वाजपेयींसोबत स्क्रीन शेअर केली. यातील भाऊ कदमच्या कामाचंही खूप कौतुक झालं.