"दारुच्या नशेमुळे त्याचा जीव गेला, संसार मोडला...", Ex पतीच्या निधनानंतर पहिल्यांदाच बोलली शुभांगी अत्रे
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 17:42 IST2025-04-25T17:41:56+5:302025-04-25T17:42:20+5:30
'भाभीजी घर पर है' फेम अभिनेत्री शुभांगी अत्रेचा एक्स पती पियुष पुरेचं काही दिवसांपूर्वीच निधन झालं. आता पियुषच्या निधनानंतर शुभांगीने याबाबत भाष्य करत ट्रोलर्सलाही उत्तर दिलं आहे.

"दारुच्या नशेमुळे त्याचा जीव गेला, संसार मोडला...", Ex पतीच्या निधनानंतर पहिल्यांदाच बोलली शुभांगी अत्रे
'भाभीजी घर पर है' फेम अभिनेत्री शुभांगी अत्रेचा एक्स पती पियुष पुरेचं काही दिवसांपूर्वीच निधन झालं. शनिवारी(१९ एप्रिल) त्यांनी या जगाचा निरोप घेतला. गेल्या काही काळापासून ते लिव्हरच्या आजाराने ग्रस्त होते. शुभांनीनेच त्यांचं निधन झाल्याची बातमी सांगितली होती. एक्स पतीच्या निधनामुळे शुभांगीवर दु:खाचा डोंगर कोसळला होता. निधनाआधी अडीच महिने शुभांगी आणि पियुष घटस्फोट घेत वेगळे झाले होते. आता पियुषच्या निधनानंतर शुभांगीने याबाबत भाष्य करत ट्रोलर्सलाही उत्तर दिलं आहे.
शुभांगीने नुकतीच ईटाम्सला मुलाखत दिली. या मुलाखतीत ती म्हणाली, "मी १६ एप्रिलला त्याच्याशी बोलले होते. आणि बरं होण्यासाठी प्रार्थना करत होते. मला दु:ख झालं आहे. मला फक्त त्याच्या चांगल्या आठवणी लक्षात ठेवायच्या आहेत. मी लवकरच इंदौरला त्याच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी जाणार आहे. माझी मुलगी अमेरिकेत आहे. परिक्षा झाल्यावर तीदेखील भारतात येईल आणि त्यानंतर आम्ही दोघी इंदोरला जाऊ".
घटस्फोटानंतर झालेल्या ट्रोलिंगवरही शुभांगीने भाष्य केलं. "काही माहित नसताना लोक तुम्हाला नावं ठेवतात. मी यशस्वी झाले म्हणून त्याला सोडून दिलं असं लोकांना वाटतं. पण, हे सत्य नाही. मला प्रसिद्धी मिळाली म्हणून मी पियुषला सोडलं नाही. तर त्याच्या दारुच्या व्यसनामुळे मी त्याला घटस्फोट दिला. मी माझं लग्न वाचवण्याचा खूप प्रयत्न केला. पण, गोष्टी माझ्या हाताबाहेर गेल्या होत्या. त्याला व्यसनमुक्ती केंद्रात पाठवलं होतं. पण, त्याचाही काही उपयोग झाला नाही. या सगळ्याचा माझ्या मुलीवरही परिणाम होत होता. तिने माझ्यापेक्षा जास्त त्रास सहन केलाय", असंही ती म्हणाली.