आईने मशेरी लावली की अविनाश नारकर जायचे परवानगी मागायला, सांगितला 'तो' गमतीशीर किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 13:50 IST2025-05-03T13:47:41+5:302025-05-03T13:50:03+5:30
Avinash Narkar : अविनाश नारकर यांनी एका मुलाखतीत लहानपणी आईकडून कोणत्या गोष्टीसाठी परवानगी हवी असेल, तर काय युक्ती करायचे.याचा गमतीशीर किस्सा सांगितला आहे.

आईने मशेरी लावली की अविनाश नारकर जायचे परवानगी मागायला, सांगितला 'तो' गमतीशीर किस्सा
अविनाश नारकर (Avinash Narkar) मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेते आहेत. अविनाश नारकर यांनी त्यांच्या सिनेकारकीर्दीत आतापर्यंत अनेक चित्रपट आणि मालिकेत काम केले आहे. सध्या ते लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत काम करताना दिसत आहेत. या मालिकेत ते काव्या आणि नंदिनीच्या सासऱ्यांच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. दरम्यान त्यांनी एका मुलाखतीत लहानपणी आईकडून कोणत्या गोष्टीसाठी परवानगी हवी असेल, तर काय युक्ती करायचे.याचा गमतीशीर किस्सा सांगितला आहे.
अविनाश नारकर यांनी नुकतेच आरपार ऑनलाइनला मुलाखत दिली. त्यात त्यांनी अनेक गोष्टींचा खुलासा केला. आईकडून कोणत्याही गोष्टीसाठी परवानगी हवी असेल तर एक युक्ती वापरत होते, याबद्दल त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, ''आम्ही चाळीत राहायचो ना. आमची आई तंबाखूची मशेरी लावायची तर मी हेरून ठेवलेलं होतं की ज्या वेळेला आई मशेरी घेऊन बसेल त्यावेळेला आईकडे हे असं काहीतरी मागायचं असेल किंवा काहीतरी आपल्याला कबूल करून घ्यायचं असेल तेव्हा असं करायचं कारण आई त्या वेळेला तंद्रीत असायची. चालू असायचं. आई राम और शाम पिक्चर आहे जाऊ.. आई खूणेनं नाही म्हणायची तेव्हा जाऊ दे ना ते संजय बिंजय सगळे जाणार आहेत. मी जातो ना. तेव्हाही नाही म्हणायची नको रे बाबा ते ओरडतात मला त्यावर मी म्हणायचो आई प्लीज लता नी साधनाला घेऊन जातो ना प्लीज. मग ती म्हणायची लवकर यायचं..कडी वाजवू नको..''
वर्कफ्रंट
अविनाश नारकर यांनी नाटक, मालिका आणि चित्रपट या तिन्ही माध्यमात काम केलंय. त्यांनी १९९४ साली मुक्ता या सिनेमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. पुत्रवती, पैंज लग्नाची, खतरनाक, मला जगायचंय, नातीगोती, धुडगूस, वादळवाट, राजा शिवछत्रपती, गोळा बेरीज, लेक माझी लाडकी अशा अनेक मालिका आणि सिनेमात काम केले. सध्या ते स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेत काम करत आहेत. याशिवाय त्यांचं पुरुष या नाटकाचे प्रयोगदेखील सुरू आहेत.