"प्रयत्ने चिंचोकी घासता लाख ही मिळे...", अशोक खरात प्रकरणावर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम सचिन गोस्वामींची पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 17:36 IST2026-03-24T17:36:07+5:302026-03-24T17:36:32+5:30
नाशिक येथील अशोक खरात प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली आहे. खरात याने अनेक महिलांचा लैंगिक छळ केल्याचा आरोप करण्यात येत आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'चे दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी फेसबुकवरुन यासंदर्भात एक पोस्ट केली आहे.

"प्रयत्ने चिंचोकी घासता लाख ही मिळे...", अशोक खरात प्रकरणावर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम सचिन गोस्वामींची पोस्ट
Ashok Kharat Case : नाशिक येथील अशोक खरात प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली आहे. खरात याने अनेक महिलांचा लैंगिक छळ केल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणी आतापर्यंत सहा गुन्हे दाखल झाले आहेत. एका विद्यार्थीनीचाही छळ केल्याचे उघड झाले आहे. अशोक खरात अनेक राजकीय नेत्यांच्याही संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. अशोक खरातचे अनेक व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सर्वच स्तरातून या प्रकरणी प्रतिक्रिया येत आहेत.
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'चे दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी फेसबुकवरुन यासंदर्भात एक पोस्ट केली आहे. अशोक खरात प्रकरणावर त्यांनी एका ओळीत मार्मिक पोस्ट लिहिली आहे. "प्रयत्ने चिंचोकी घासता लाख ही मिळे...", असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्यांची ही पोस्ट प्रचंड व्हायरल झाली आहे. अशोक खरातने महिलांचे लैंगिक शोषण करण्याबरोबरच अघोरी विद्या करून संमोहनविद्येद्वारे त्याने लोकांकडून पैसे उकळल्याचंही समोर आले आहे. अशोक खरात मंदिर परिसरात नकली साप आणि वाघाचे कातडे ठेवून लोकांमध्ये भीती निर्माण करत होता. नकली साप जिवंत असल्याचं भासवून त्याने लोकांमध्ये भीती निर्माण केली होती. त्याबरोबरच १०० रुपये किलो भावाने बाजारात मिळणारे रानटी चिचोक्यांना पॉलिश करून आणि मढवून अशोक खरात हा भाबड्या भाविकांना प्रती नग तब्बल १० हजार ते एक लाख रुपयांना विकायचा. असाच प्रकार तो नकली खडे व रत्ने असली म्हणून विकताना करायचा असेही तक्रारीत म्हटले आहे.
अशोक खरात याला न्यायालयासमोर आज हजर करण्यात आले. त्यावेळी पोलिसांनी त्याने केलेले प्रताप न्यायालयात सांगितले. "अशोक खरात हा महिलांना पाणी प्यायला द्यायचा. महिलांना जाळ्यात ओढायचा. तो स्वतः सिद्ध पुरुष असल्याचे सांगून महिलांवर अत्याचार करत होता. त्याने पाच नरबळी दिल्याचा संशय आहे. त्याच्या फार्महाऊसवर गोळीबार करण्यात आलेली रिकामी काडतुसे मिळाली आहेत. ती त्याने कुठे वापरली याचाही तपास करायचा आहे", अशी धक्कादायक माहिती नाशिक पोलिसांनी न्यायालयात दिली. दरम्यान, न्यायालयाने सुनावणीअंती खरातला २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.