अर्जुन बिजलानी ठरला 'राईज अँड फॉल'चा विजेता, म्हणाला, "खूप स्ट्रेसफुल प्रवास होता तरी..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 17:40 IST2025-10-17T17:39:03+5:302025-10-17T17:40:34+5:30
अर्जुन बिजलानीला मिळाली इतकी प्राईज मनी!

अर्जुन बिजलानी ठरला 'राईज अँड फॉल'चा विजेता, म्हणाला, "खूप स्ट्रेसफुल प्रवास होता तरी..."
Rise and Fall Winner: सलमान खानच्या 'बिग बॉस १९' या रिअॅलिटी शोला टक्कर देणारा आणि अश्नीर ग्रोव्हरने होस्ट केलेला रिअॅलिटी शो 'राईज अँड फॉल' चा आज अंतिम सोहळा पार पडला. अभिनेता अर्जुन बिजलानी या शोचा विजेता बनला. शोमध्ये धनश्री वर्मा, अरबाज पटेल, कुब्रा सैत, कीकू शारदा असे अनेक स्पर्धक होते. सर्वांवर मात करत अर्जुनने शो जिंकला. त्याला ३० लाख प्राईज मनीही मिळाली. बाहेर आल्यानंतर त्याने पहिली प्रतिक्रिया दिली.
स्ट्रेसफुल प्रवास होता पण...
अर्जुन बिजलानी म्हणाला, "हा प्रवास खूपच स्ट्रेसफुल होता. मनाच्या शांततेसाठी मी बायको आणि मुलाचा फोटो पाहायचो. मला त्यांच्याकडे बघून बळ मिळायचं. सोबतच माझा गणपती बाप्पावर विश्वास होता. मी रोज सकाळी उठून बाप्पाचं नाव घ्यायचो. तसंच मला पश्चात्ताप होईल असं काहीही न वागण्याचं वचन मी स्वत:लाच दिलं होतं. आज मी अभिमानाने सांगू शकतो की मी या शोचा विजेता म्हणून बाहेर आलो आहे आणि माझ्या मनात याबद्दल थोडीही शंका नाही."
तो पुढे म्हणाला, "मी हा खेळ अगदी मनाने खेळलो आहे. मी कोणत्याही आव्हानाला स्ट्रॅटेजीने उत्तर द्यायचो. मी जसा आहे तसाच या पूर्ण खेळात राहिलो. बोलतोय एक आणि करतोय वेगळंच असं मी कधी केलं नाही. हीच कदाचित माझी सर्वात मोठी ताकद होती. मी प्रामाणिकपणे खेळलो. या शोने मला एक स्ट्राँग व्यक्ती बनवलं. प्रत्येक दिवशी एक नवीन आव्हान, धडा आणि पुढे जाण्याचं नवीन कारण मिळत गेलं."