रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 14:49 IST2025-08-04T14:46:37+5:302025-08-04T14:49:55+5:30
चित्रपटात काम करणाऱ्या कलाकारांना पुरस्कार मिळतो. कंटेट क्रिएटर्सलाही नॅशनल अवॉर्ड मिळतात. पण, टेलिव्हिजनवर काम करणाऱ्या कलाकारांना मात्र असा कोणताही पुरस्कार दिला जात नसल्याची खंत टीव्ही अभिनेत्रीने व्यक्त केली आहे.

रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
७३व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. वर्षभरातील सर्वोत्कृष्ट ठरलेल्या चित्रपट आणि कलाकारांना हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. मात्र चित्रपटात काम करणाऱ्या कलाकारांना पुरस्कार मिळतो. कंटेट क्रिएटर्सलाही नॅशनल अवॉर्ड मिळतात. पण, टेलिव्हिजनवर काम करणाऱ्या कलाकारांना मात्र असा कोणताही पुरस्कार दिला जात नसल्याची खंत टीव्ही अभिनेत्रीने व्यक्त केली आहे.
'अनुपमा' फेम रुपाली गांगुलीने एका इव्हेंटमध्ये हजेरी लावली होती. तेव्हा विरल भय्यानी या पापाराझी चॅनेलशी बोलताना अभिनेत्रीने टेलिव्हिजन इंडस्ट्रीला राष्ट्रीय पुरस्कार नसण्याबाबत भाष्य केलं. ती म्हणाली, "क्योंकी सास भी कभी बहु थी पुन्हा सुरू झालंय आणि स्मृती इराणींनी टेलिव्हिजनवर कमबॅक केलं आहे. एवढी मोठी व्यक्ती टीव्हीवर परतली. ही खूप मोठी गोष्ट आहे. टेलिव्हिजन काम करण्यांसाठी कोणताही राष्ट्रीय पुरस्कार नाही. आता स्मृती इराणींनी टेलिव्हिजनवर कमबॅक केलंय तर या गोष्टीचा विचार केला जाऊ शकतो".
"आज कंटेट क्रिएटर्ससाठी नॅशनल अवॉर्ड आहे. प्रत्येक प्रादेशिक सिनेमासाठी नॅशनल अवॉर्ड आहे. पण फक्त टेलिव्हिजनला नाही. टेलिव्हिजनवाले न थांबता नॉनस्टॉप काम करतात. कोव्हिडमध्ये बाकी सगळ्यांना त्यांचे शूटिंग पुढे ढकलता आले. मात्र आम्ही रोज काम करत होतो. जेव्हा एक फिल्मस्टार सलग २ दिवस शूट करत असेल तर त्याची मोठी बातमी बनते. पण, टीव्ही इंडस्ट्री कोव्हिडमध्ये शूट करत होती त्याची कोणतीच बातमी झाली नाही. मी सरकारला विनंती करते की आमचीही दखल घ्या. आम्हीदेखील खूप मेहनत करतो. थोडसं कौतुक झालं तर आम्हालाही बरं वाटेल", असंही रुपालीने म्हटलं आहे.